पुणे

भोर-महाड रस्ता वाहतुकीसाठी खुला

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा :  भोर-महाड महामार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारीसाठी बंद केलेला वरंध घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस खुला करण्यात आला असल्याची माहिती प्रांतधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
पंढरपूर – भोर – महाड या महामार्ग क्र. 965 डी. डी.वर भोर तालुक्याचे मुख्यालयापासून 40 कि. मी. वरंध घाट येत आहे. या घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील या घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरूपाच्या घटना घडून जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता असताना त्या सुरक्षिततेच्या दृष्टीने 30 सप्टेबरपर्यंत वाहतूक बंद करण्यात यावी, असे जाहीर केले होते.

काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीबाबत कोणताही रेड, अथवा अंबर इशारा दिलेला नसल्याने अतिवृष्टी व सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद केलेला वरंध घाट रस्ता सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यास हरकतीचे नाही असा अहवाल उपविभागीय अधिकारी भोर यांनी सादर केला आहे. ज्याअर्थी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी सद्य:स्थितीत पाऊस कमी झाला असून, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी व स्थानिक रहिवाशी इत्यादी लोकांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत असून, अतिवृष्टीच्या कारणास्तव बंद केलेला वरंध घाट रस्ता सर्व वाहतुकीसाठी खुला करण्याची बाब निदर्शनास आणून दिली असताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यांची माहिती घेऊन वरंध घाट रस्ता वाहनांच्या वाहतुकीबाबत सुधारित अधिसूचना जाहीर करून घाट सर्व वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे,असे प्रांतधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT