पुणे

नांदगावच्या भात व्यापार्‍याकडून भोरच्या शेतकर्‍यांची फसवणूक

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा :  गावातील मध्यस्थी दलाल, व्यापारी यांनी नांदगाव (ता. भोर) येथील आठ भात उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. हनुमंत पर्वती कुडले, शंकर दिनकर कुडले, मोहन नानू मांढरे, सखाराम नामदेव नागवडे, धुळाजी कृष्णा कुडले, हिराबाई बबन कुडले, ज्ञानेश्वर काळुराम कुडले, एकनाथ मारुती कुडले या शेतकर्‍यांची सातारा जिल्ह्यातील आनेवाडीतील भात व्यापार्‍याने फसवणूक केल्याचे शेतकरी हनुमंत पर्वती कुडले यांनी सांगितले.

नांदगाव (ता. भोर) येथील आठ शेतकर्‍यांनी इंद्रायणी जातीचे भात स्थानिक दलालांकरवी आनेवाडी (ता. जावली, जि. सातारा) येथील भात व्यापार्‍यास विक्री केले. व्यापार्‍याने भात ताब्यात घेताना शेतकर्‍यांना काही रोख रक्कम व काही पुढील चार दिवसांचा धनादेश दिला. मात्र, दीड महिना उलटून गेला तरी व्यापार्‍याने शेतकर्‍यांना दिलेले धनादेश बँकेत वटले गेले नसल्याने शेतकर्‍यांची मोठी फसवणूक झाली आहे. अशीच घटना विसगाव खोर्‍यातील बाजारवाडी गावात घडली असून, भोर तालुक्यातील सोयाबीन व्यापार्‍याने आठ ते दहा शेतकर्‍यांना फसविल्याचे समोर येत आहे. शेतकर्‍यांना फसविणार्‍या व्यापार्‍यांची टोळी भोर तालुक्यात सक्रिय असून, या फसव्या व्यापार्‍यांना आवर कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

SCROLL FOR NEXT