मंचर: दत्तात्रयनगर पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2024-25 मध्ये गाळप केलेल्या उसास एफआरपीनुसार प्रथम अॅडव्हान्स 2 हजार 800 रुपये प्रति मेट्रिक टन वजा जाता उर्वरित 280 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे गाळप केलेल्या 11 लाख 38 हजार 496 मेट्रिक टनास 31 कोटी 87 लाख 78 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच वर्ग करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
मंचर येथे रविवारी (दि. 27) झालेल्या पत्रकार परिषदेला कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक दादाभाऊ पोखरकर, बाळासाहेब घुले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, मुख्य लेखापाल राजेश वाकचौरे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. 26) रात्री झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत एफआरपीनुसार प्रथम अॅडव्हान्स 2 हजार 800 टन वजा जाता उर्वरित 280 रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रथम अॅडव्हान्स जाहीर करताना हंगाम 2024-25 करिता अंदाजे 12 टक्के साखर उतारा घेऊन एफआरपी 3 हजार 100 रुपये प्रति मेट्रिक टन ग्राह्य धरून दुसरा हप्ता 300 रुपये प्रति मेट्रिक टन देता येईल, असे जाहीर केले होते. तथापि, उच्च न्यायालय व शासन निर्णयानुसार येत असलेल्या एफआरपी रकमेतून प्रथम अॅडव्हान्स 2 हजार 800 रुपये प्रति मेट्रिक टन वजा जाता 280 रुपये प्रति मेट्रिक टन फरक येत आहे.
गाळप हंगाम 2024-25 मध्ये 11 लाख 38 हजार 496 मेट्रिक टन ऊस गाळप करून सरासरी 12.00 टक्के साखर उताऱ्याने 12 लाख 52 हजार 600 साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे 7 कोटी 33 लाख 6 हजार युनिट उत्पादन करून कारखाना वापर वजा जाता 3 कोटी 64 लाख 45 हजार युनिट वीज वितरण कंपनीला निर्यात केली आहे.
तसेच, 10 के.एल.पी.डी. डिस्टिलरी प्रकल्पामधून आजअखेर 1 कोटी 19 लाख 10 हजार बल्क लिटर रेक्टिफायर स्पिरिटचे उत्पादन झाले असून, 91 लाख 10 हजार बल्क लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले असून, डिस्टिलरी प्रकल्प चालू आहे.
शेतकर्यांचा कळवळा असल्याची नौटंकी करू नये
भीमाशंकर साखर कारखान्याने प्रत्येक हंगामाची एफआरपीनुसार येणारी फरकाची रक्कम हंगाम संपल्यानंतर अदा केलेली आहे. त्यामुळे एफआरपी दराबाबत पत्रव्यवहार करून व केलेल्या पत्रव्यवहाराची जाहिरात करून शेतकर्यांचा कळवळा असल्याबाबत नौटंकी करू नये, असा टोला अध्यक्ष बेंडे यांनी माजी अध्यक्ष निकम यांचे नाव न घेता लगावला.