भीमाशंकरला नटे-नारेश्वर का म्हणतात, मंदिर कधी बांधण्यात आले? Pudhari
पुणे

Bhimashankar Temple: भीमाशंकरला नटे-नारेश्वर का म्हणतात, मंदिर कधी बांधण्यात आले?

या मंदिराचे वैशिष्ट्य, आख्यायिका काय, पुणे- मुंबईवरून कसे जाता येईल हे जाणून घेऊया...

पुढारी वृत्तसेवा

Bhimashankar Temple History, Architecture Information In Marathi

अशोक शेंगाळे, पुढारी वृत्तसेवा

बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील देवस्थान श्रावणी यात्रेसाठी सज्ज झाले असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे ४ हजार फुट उंचीवर असल्याने थंड हवा, बोचरी थंडी व पावसाळ्यात जोरदार पाऊस, दाट धुके आदी निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर आहे. त्यामुळे भाविकांसह पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू भीमाशंकर आहे. परिणामी श्रावण महिन्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य, आख्यायिका काय, पुणे- मुंबईवरून कसे जाता येईल हे जाणून घेऊया...

भीमाशंकर मंदिर कधी बांधण्यात आले?

सह्याद्रीच्या कुशीतील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे पवित्र स्वयंभू ज्योर्तिर्लिंग हे प्राचीन काळापासून हेमांडपंती शैलीचे मंदिर आहे. येथे शिवपार्वती हे अर्ध्या भागात वसल्याने नटे-नारेश्वर असेही म्हटले जाते. येथे भीमा नदीची उत्पत्ती शंकराच्या घामापासुन झाली आहे. त्यामुळे भीमेचे उगमस्थानच येथे आहे. पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेऊन पायऱ्यांनी वर आल्यावर कळमजाई मातेचे मंदिर आहे. तेथील दर्शन घेतल्यानंतरच पूर्ण दर्शन होते अशी आख्यायिका आहे. अनादी काळापासून येथे महाशिरात्री व श्रावण महिना यात्रा उत्साहात साजरी होते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे पवित्र शिवलींगाचे दर्शन पवित्र मानले जाते. भीमाशंकरचे मंदिर कोरीव काळ्या दगडांमध्ये १२ व्या शतकाच्या मध्यकाळात बांधले आहे .

भीमाशंकरचे वैशिष्ट्य काय?

श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. भीमाशंकर मंदिर व जंगल परीसरात अनेक ऐतिहासिक वास्तु व ठिकाणे आहेत. यामध्ये मंदिराबाहेर असलेली पोर्तुगीज काळातील घंटा, घंटेला लागून असलेले शनि मंदिर, मंदिराजवळचे गोरक्षनाथ मंदिर, पायऱ्यांच्या सुरुवातीला असलेले कमलजादेवी मंदिर ही प्राचीन मंदिरे आहेत.

यासह भीमाशंकर अभयाण्यात हनुमान तळे या ठिकाणी हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे. जंगलात गुप्त भीमाशंकर हे ठिकाण असून, येथे साक्षीविनायकाचे मंदिर आहे. नागफणी, मुंबई पाँईट, भीमाशंकर मंदिराजवळून उगम पावलेली भीमा नदी तेथेच गुप्त झाली व या गुप्त भीमाशंकर ठिकाणाहून पुन्हा पुढे वाहु लागली, अशी आख्यायिका असून येथील नदीत कृत्रीम तयार झालेले शिवलिंग आहे. याचे दर्शन करण्यासाठी भाविक जंगलातून पायी येथे येतात. अनादी काळापासून येथे श्रावण महिना यात्रा उत्साहात साजरी होते. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे पवित्र शिवलिंगाचे दर्शन पवित्र मानले जाते.

भीमाशंकर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

 भीमाशंकर सह्याद्री पर्वत रांगांतील एक उत्तुंग शिखरावर वसलेले घनदाट अभयारण्य. पुणे, रायगड व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर १३०.७८ चौरस किलोमीटरमध्ये हे अभयारण्य कड्यांमुळे दोन भागात पसरलेले आहे. १९८५ मध्ये भीमाशंकरचे हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित झाले आहे. हा अतिवृष्टी पावसाळी प्रदेश, थंड हवेचे ठिकाण व वाड्यावरून नजरेच्या टप्प्यात सभोवतालचा परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. शेकरू या मोठ्या खारीसाठी देखील हे अभयारण्य प्रसिध्द आहे.

भीमाशंकरजवळची पर्यटनस्थळे कोणती?

निसर्गसौंदर्याने नटलेला पावसाळ्यातील पोखरी घाट, भीमाशंकर, निगडाळे, आहुपे, कोंढवळ, डिंभे धरण या परिसरातील पोखरी घाटातील धबधबे, दुतर्फा असलेली झाडी, उंचच उंच डोंगर, खळाळणारे ओढे-नाले, हिरवीगार झालेली झाडी, डोंगर उतारावरून कोसळणारे धबधबे तसेच डोंगरी भागात वसलेली छोटी उतरत्या छपरांची घरे असलेल्या गावांमुळे हा परिसर सौंदर्याने नटलेला आहे. निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत.

मानवी वर्दळीपासून दूर असलेला हा परिसर निसर्गसौंदर्याने फुलला आहे. त्याचप्रमाणे प्रतिमहाबळेश्वर असलेल्या आहुपे येथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दाट धुक्यात हा परिसर झाकून गेला असून, आभाळ धरतीला टेकल्याचा आभास होत आहे.

हे ठिकाण तीर्थक्षत्राबरोबरच पर्यटनासाठी लोकांना आकर्षित करते. निसर्गाची मुक्त उधळण या परिसरात पाहावयास मिळते. जंगलात प्राणी, पशू-पक्षी, रंगबिरंगी फुलपाखरे आढळतात. याच जंगलात अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आहेत. कोकण कडा, अवनस्पती पॉईंट नागफणी, भाकादेवी भटीचेरान, कोथरणे, मंदोशी, पोखरी, डिंभे जलाशय, गोहे जलाशय, कोंढवळ परिसरातील रम्य धबधबे ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

भोरगड कुठे आहे?

भोरगड हे ठिकाण भीमाशंकरलगत जंगलात असून, येथे जुन्या काळातील लेणी आणि मंदिरे आहेत. अभयारण्य देवताच्या मूर्ती आहेत. १३०.७८ चौरस किमी पसरलेले भोरगड हा एकमेव किल्ला येथे आहे. हे जंगल सदा हरित, गर्द हिरव्या रंगात माखलेले असते. येथील लेण्या झाडीने व्यापलेल्या आहेत.

पावसाळी पर्यटनासाठी अतिशय उत्तम ठिकाण भीमाशंकर आहे. या ठिकाणी असलेल्या सर्वांत उंच अशा नागफणी टोकावर गेल्यावर कड्याच्या तळापर्यंत खेटलेली मुंबईच्या आजूबाजूची गावे, पदरचा किल्ला, तुंगी, कळवंतीचा महाल, माथेरानची पर्वतरांग, घोणेमाळ, सिध्दगड असा परिसर दिसतो. अनेक हौशी पर्यटक कर्जत खांडसमार्गे गणेश घाट, शिडी घाटामार्गे पायीदेखील भीमाशंकरला येतात.

भीमाशंकरला कसे याल?

मुंबई से भीमाशंकर हे अंतर २४० किलोमीटर, तर पुणे-भीमाशंकर हे अंतर १२५ किलोमीटर आहे. भीमाशंकरकडे येण्यासाठी मंचर, घोडेगाव, डिंभे, तळेघरमार्गे एक रस्ता आहे. राजगुरुनगर-वाडा आणि तळेघरमार्गे एक रस्ता आहे. काही धाडसी पर्यटक हे शिडी घाटाच्या वाटेने पायी चढून येतात. भीमाशंकरमध्ये येण्यासाठी एकमेव मंचरमार्गे रस्ता असून, पुणे (शिवाजीनगर) आगारातून दर दोन तासांनी एसटी बस उपलब्ध आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT