भीमाशंकर देवस्थान खेडमध्ये अन् रस्तेविकास आंबेगावात! File Photo
पुणे

भीमाशंकर देवस्थान खेडमध्ये अन् रस्तेविकास आंबेगावात!

सर्वाधिक भाविकांकडून तळेगाव, धामणे, पाईट, सातकरवाडी, भोरगिरी रस्त्याचा वापर

पुढारी वृत्तसेवा

सुषमा नेहरकर-शिंदे

राजगुरुनगर: देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भगवान शिवशंकरांचे जागृत देवस्थान श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान खेड तालुक्यात येते. या तीर्थक्षेत्र व पर्यटन ठिकाणी जाण्यासाठी पुणे व मुंबईमार्गे येणार्‍या देशभरातील भाविकांना मॅपच्या आधारे जावे लागते.

सर्वाधिक जवळचा व निसर्गरम्य वाहतूक मार्ग म्हणून खेड तालुक्यातील तळेगाव व चाकण एमआयडीसीतीतून धामणे फाटा, पाईट, सातकरवाडी, भोरगिरी रस्ता व वाडा रोड, भोरगिरी-भीमाशंकर रस्त्यांचा पर्याय देतो. मात्र, हे रस्ते अतिशय दुरवस्थेत आहेत. भीमाशंकर देवस्थान खेड तालुक्यात असून, रस्ते विकास मात्र आंबेगाव तालुक्याकडे होत आहेत. यामुळे या रस्त्यांकडे प्रशासनाचे देखील दुर्लक्ष होत आहे.

सार्वजनिक वाहतूक म्हणजे एसटीने प्रवास करायचा असेल, तर आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव, डिंभे, भीमाशंकर रस्त्यांचा पर्याय आहे. भीमाशंकर देवस्थान खेड तालुक्यात येत असले तरी आंबेगावच्या सक्षम नेतृत्वामुळे भीमाशंकर विकास आराखड्यातून आंबेगाव तालुक्यातील रस्त्यांचा विकास झाला.

मंचर, घोडेगाव ते भीमाशंकर रस्त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील 30 ते 40 गावांचा झपाट्याने विकास आणि प्रचंड कायापालट झाला. परंतु, खेड तालुक्यातून सर्वात जवळचा व अत्यंत निसर्गरम्य अशा दोन्ही मार्गांची सध्या अतिशय दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून एकदा प्रवास केला, तर पुन्हा प्रवास करण्याची इच्छा होणार नाही.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर देवस्थान म्हणजे मुख्य मंदिर खेड तालुक्याच्या हद्दीत येते, तर अन्य परिसर आंबेगाव तालुक्यात येतो. या एकाच संधीचा फायदा घेऊन आंबेगाव तालुक्यातील आमदार, खासदार व अन्य सर्वच लोकप्रतिनिधींनी जास्तीत जास्त निधी आपल्या तालुक्यात आणला.

या देवस्थानच्या नावाखाली आपल्या भागातील लोकांचा, गावांचा विकास होऊ शकतो, हे ओळखून दर्जेदार व सुसज्ज असे रस्ते बनवले. एकदा का एखाद्या भागात दळणवळणाची साधने दर्जेदार झाली, तर पर्यटनातून विकास अपोआप चालत येतो, याचे उत्तम उदाहरण सध्या आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव, डिंभे, भीमाशंकर रस्त्यांवर प्रचंड झपाट्याने वाढ झालेल्या हॉटेल व्यवसाय व पर्यटनस्थळांवरून लक्षात येते.

आज या रस्त्यावर काही फाईव्ह स्टार हॉटेलसह जागोजागी अनेक लहान-मोठे हॉटेल व्यवसाय उदयास झाले आहेत व एक रस्ता चांगला दर्जेदार असेल, तर परिसराचा विकास किती झपाट्याने होऊ शकतो, हे आपण पाहतोय.

याउलट सध्या खेड तालुक्याचे हक्काचे देवस्थान असूनही तळेगाव व चाकण एमआयडीसीतीतून धामणे फाटा, पाईट, सातकरवाडी, भोरगिरी रस्ता व वाडा रोड, भोरगिरी-भीमाशंकर हे दोन्ही रस्ते अंत्यत निसर्गरम्य मार्ग व तुलनेने जवळचे मार्ग असताना दोन्ही रस्त्यांची प्रचंड दुरवस्था असल्याने विकास आराखड्यातील विकास कागदावरच राहिला आहे.

चाकण एमआयडीसीतून धामणे फाटा, पाईट, सातकरवाडी, भोरगिरी रस्त्यावर तब्बल 50 ते 55 किलोमीटरमध्ये केवळ रस्त्यांचा विकास न झाल्याने साधे चहा व वडापाव खाण्यासाठी निवांत बसण्याचे ठिकाण नाही.

हीच परिस्थिती राजगुरुनगर, चास, बुरसेवाडी, वाडा रोड, भोरगिरी-भीमाशंकर मार्गांवर आहे. हा मार्ग अत्यंत निसर्गरम्य मार्ग असून, तब्बल 20 ते 25 किलोमीटर मार्गाला चासकमान धरणाच्या जलाशयाचा किनार लाभला आहे. परंतु, वाड्यापासून पुढे या रस्त्यांची देखील प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर देखील एकही चांगले हॉटेल अथवा चहा-वडापावची टपरी नाही.

भोरगिरी-भीमाशंकर ट्रेक दुर्लक्षित

सध्या बहुतेक सर्व ट्रेकर्ससाठी व लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना सहज शक्य होईल असा भोरगिरी ते भीमाशंकर हा अभयारण्याच्या घनदाट जंगलातून केवळ अर्धा-एक तासाचा ट्रेक सर्वांचे मोठे आकर्षण केंद्र आहे. परंतु, याकडे देखील अपेक्षित लक्ष न दिल्याने तालुक्यातील पर्यटन विकासाला खीळ बसली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT