मंचर: भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता दैनंदिन 10 हजार मेट्रिक टन भविष्यात करावी लागणार आहे. कारण आजूबाजूचे खासगी आणि सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने स्वतःची गाळप क्षमता वाढवतात आणि त्यामुळे ऊस तिकडे जातो. यासाठी भीमाशंकर कारखाना भविष्यात ऊस गाळप क्षमता वाढवणार असल्याचे सुतोवाच कारखान्याचे संस्थापक संचालक आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सभा पारगाव कारखाना (ता. आंबेगाव) येथील दत्तात्रयनगर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी सभासदांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. (Latest Pune News)
भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले, भीमाशंकर कारखाना नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित पाहून त्यांना चांगला दर देत आहे. मात्र काही जण कारखान्याकडून कमी दर दिला जात असल्याचा गैरसमज निर्माण करतात. यामागे त्यांचा छुपा अजेंडा आहे.
मागील वर्षी विरोधकांनी 3 हजार 325 रुपयांनी भाव द्यावा, अशी मागणी केली होती. हा भाव दिला असता तर कारखान्याला 9 कोटी 78 लाख रुपयांचे नुकसान झाले असते. त्या माध्यमातून कारखान्याचे नुकसान झाले असते आणि कारखाना आजारी पाडण्याचे काम काही जण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
देवदत्त निकम यांना आव्हान
देवदत्त निकम यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा-लोकसभा निवडणूक काळात भीमाशंकर कारखान्याच्या वतीने भाग निधीत असलेल्या पैशांचा वापर मर्जीप्रमाणे करण्यात आला. अनेकांना आचारसंहितेच्या काळात सही करून कोरे चेक देण्यात आले होते. आम्ही सांगू त्यावेळेस चेकवर तारीख टाका, असे सांगून निवडणूक संपल्यावर चेक वटवण्यात आले असा आरोप देवदत्त निकम यांनी केला होता. या आरोपाची खिल्ली उडवत वळसे पाटील म्हणाले, आतापर्यंत भीमाशंकर कारखान्याने कोणालाही कोरा चेक दिला नाही. दिले असेल तर ते सिद्ध करा, लगेच कारखान्याचे अध्यक्ष यांचा राजीनामा घेतो, असे आव्हान निकम यांना दिले.
कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांनी जो कारभार केला आहे, जे निर्णय घेतले आहेत त्याला मान्यता आहे का? याबाबत सभासदांना उत्तरे देऊन प्रश्न विचारायचे असतात. गेल्या वर्षी कारखान्याच्या वार्षिक सभेत एका संचालकानेच प्रश्न विचारून सभेत गोंधळ घालणे नियमाला धरून नाही.- दिलीप वळसे पाटील, संस्थापक संचालक, भीमाशंकर साखर कारखाना
देवदत्त निकम यांना कारखान्याचे अध्यक्ष केले. ज्यावेळी त्यांना अध्यक्ष केले, त्यावेळी वळसे पाटील माझे दैवत आहे, त्यांचा फोटो घरात लावला व आता मात्र फोटो काढून टाकला. हा सर्व मतलबीपणा आहे.- बाळासाहेब बेंडे, अध्यक्ष, भीमाशंकर कारखाना