मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा करताना येथील पर्यावरण व शेकरू यांना पूरक अशी कामे व्हावीत. प्लास्टिकबंदीची कडक अंमलबजावणी करावी तसेच कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशा सूचना अवर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी केल्या आहेत.
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडाअंतर्गत कुंभमेळा 2027 मध्ये होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन व इतर सोयीसुविधा देण्यासाठी सुचविलेल्या कामांची व परिसराची पाहणी व्ही. राधा यांनी केली. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जुन्नर-आंबेगाव विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, आंबेगाव तहसीलदार संजय नागटिळक, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे व सर्वच विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. (Latest Pune News)
या वेळी निगडाळे नियोजित भाविक सुविधा केंद्र, वाहनतळ तसेच मंदिर परिसर, महादेव वन व कोकणकडा याची पाहणी करण्यात आली. या वेळी उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर पुढीलकर यांनी काही सूचना मांडल्या. भीमाशंकर आराखडा करताना ग््राामस्थांना विचारात घेऊन केला जावा, आमच्या सूचनांचा विचार व्हावा तसेच आराखड्यासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करताना नागरिकांना विश्वासात घेऊन केली जावी. श्रीक्षेत्र भीमाशंकरमधील सांडपाण्याचा प्रमुख प्रश्न लवकर मार्गी लागावा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावर व्ही. राधा यांनी आराखडा ग््राामस्थांना विचारात घेऊनच केला जाईल तसेच सांडपाण्याचे कामही लवकर मार्गी लावले जाईल. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आवश्यक ती कामे केली जातील, असेही त्यांनी ग््राामस्थांना आश्वासित केले.
यानंतर सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांना येथील पर्यावरण व शेकरूचेही आकर्षण आहे. हे टिकावे, याचे सौंदर्य वाढावे, यासाठी आराखड्यात वेगवेगळी कामे समाविष्ट व्हावीत तसेच पायरी मार्गावर स्वच्छतागृह असावे, भीमा नदीपात्र स्वच्छ करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
भीमाशंकरमध्ये सर्वत्र प्लास्टिक पसरलेले दिसते. येथील दुकानदार, भाविक व पर्यटक यांच्यावर पूर्ण प्लास्टिकची बंदी केली जावी, याची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना केल्या.- व्ही. राधा, अवर मुख्य सचिव