पुणे

भीमा नदीपात्राला जलपर्णीचा विळखा

अमृता चौगुले

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांच्या हद्दीतून वाहणारे भीमा नदीपात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही जलपर्णीच्या विळख्यात अडकत चालले आहे. परिणामी, पाणी दूषित झाल्याने त्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच पाण्याला दुर्गंधी सुटली असून, जलचरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, सादलगाव, बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, वडगाव रासाई, रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, राक्षेवाडी तसेच दौंड तालुक्यातील हातवळण, नानगाव, वाळकी, कानगाव, पारगाव, देलवडी, पिंपळगाव, राहू भागातून भीमा नदी वाहते. नदीपात्राला सध्या जलपर्णीने विळखा घातला आहे. या जलपर्णीमुळे परिसरात डासांची उत्पत्ती वाढली आहे.

त्यामुळे ग्रामस्थ डासांच्या त्रासामुळे वैतागले आहेत. तर पाण्याला दुर्गंधीही सुटली आहे. पाणी प्रदूषित झाल्याने जलचरांसह नदीचे पाणी पिणार्‍या जनावरांच्या आरोग्यालाही धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधून येणारा मैला, टाकाऊ कचरा तसेच विविध कंपन्यांमधील रसायनयुक्त सांडपाणी नदीच्या पाण्यात प्रक्रिया न करता सोडले जाते. त्यामुळे अनेक जलचरांसह मासे दरवर्षी मृत्युमुखी पडत आहेत. सध्या गावांमध्ये जलपर्णीमुळे डासांची उत्पत्ती वाढून रात्रीच्या वेळी नागरिकांना, जनावरांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यावर उपाय म्हणून गोठ्यासह घरांमध्ये पंखे व जाळ्या बसविण्याची वेळ आली आहे, असे सादलगावचे सरपंच अविनाश पवार यांनी सांगितले.

मांडवगण फराटा हद्दीतील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, या पाण्यावर हळूहळू जलपर्णी वाढू लागली आहे. बहुतांश नदीपात्र जलपर्णीने काबीज केले आहे, त्यामुळे पाणी दूषित झाले आहे, असे सरपंच समीक्षा फराटे पाटील यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT