भीमा नदीचे पात्र जलपर्णीच्या विळख्यात; नागरिकांच्या आरोग्याला धोका Pudhari File Photo
पुणे

भीमा नदीचे पात्र जलपर्णीच्या विळख्यात; नागरिकांच्या आरोग्याला धोका

शिरूर, दौंडमधील चित्र

पुढारी वृत्तसेवा

मांडवगण फराटा: शिरूर आणि दौंड तालुक्यातील भीमा नदीचे पात्र जलपर्णीच्या विळख्यात दिवसेंदिवस अडकत चालले आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

जलपर्णीमुळे पाणी दूषित झाल्याने त्यामध्ये डासांची उत्पत्ती वाढली असून, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नदीचे पाणी पिणार्‍या जनावरांच्या आरोग्यालादेखील धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामध्येच गेले काही दिवसांपासून सतत वातावरणात बदल झाला आहे.

दिवसा कडक ऊन पडत आहे तर संध्याकाळी थंडी जाणवत आहे. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे जलपर्णी सुकून त्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. मध्यंतरी साखर कारखान्याचे मळीमिश्रित पाणीदेखील भीमा नदीच्या पाण्यामध्ये सोडण्यात आल्यामुळे साठवलेल्या पाण्यामध्ये देखील दुर्गंधी पसरली आहे.

दौंड आणि शिरूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरील अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. उन्हाळा सुरू झाला की या परिसरातील अनेक नागरिक भीमा नदीवर पोहण्यासाठी जात होते. परंतु दिवसेंदिवस जलपर्णीमुळे व मळीमिश्रित पाण्यामुळे नदीपात्रात पोहण्यासाठी नागरिक जात नाहीत. कारण नदीची अवस्था बिकट झाली आहे.

पाण्यातील फुटव्हॉल्वला अडकते जलपर्णी

अनेक शेतकर्‍यांनी आपल्या शेतीसाठी पाणी भीमा नदीच्या पात्रातून नेले आहे. परंतु जलपर्णीमुळे पाण्यातील फुटव्हॉल्वला जलपर्णी गुतली की विद्युतपंप बंद पडत आहेत, त्यामुळे शेतकर्‍यांना देखील रात्री-अपरात्री पुन्हा नदीपात्रामध्ये पाइपच्या फुटव्हॉल्वला गुंतलेली जलपर्णी काढण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्यामध्ये उतरावे लागते आहे. जलपर्णी हटवण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा आवाज उठवला, परंतु आद्यपही शासनाने यावर कोणतीही उपाययोजना केली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT