भिगवण: भिगवणच्या पोलिस ठाण्याचे इमारत पूर्ण होत आली असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. ही इमारत कोट्यवधींची खर्च करून दिमाखात उभी राहिली आहे. मात्र, गेटअभावी या इमारतीत मोकाट जनावरांचा मुक्तसंचार व उपद्रव वाढला आहे. या कोट्यावधींचा खर्च केलेल्या इमारतीला गेटऐवजी हिरव्या नेटचे अच्छादन लावले आहे.
तब्बल पाच कोटी खर्च करून भिगवण पोलिस ठाण्याची भव्य इमारत आता उभी राहिली आहे. इमारतीच्या आतील फर्निचरचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. तर बाह्य बाजूचे कामही अत्यल्प राहिले आहे.
पूर्वी भिगवण पोलिस ठाण्याचा कारभार अक्षरशः झाडाखाली बसून करण्याची वेळ आली होती. दरम्यान माजी लोकप्रतिनिधी यांच्या कार्यकाळात पोलिस ठाण्याला मंजूरी मिळाली. आता विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी पुढील कामाला महत्वपूर्ण रेटा दिल्याने ही इमारत दिमाखात उभी राहिली आहे.
या इमारतीच्या रंगरंगोटीचे काम झाले आहे. मात्र, मुख्य गेट बसवले नसल्याने मोकाट जनावरांसह या इमारत परिसरात डुकरांचाही मुक्त संचार वाढला आहे. ही जनावरे, डुकरे इमारतीच्या भितींना आपले शरीर घासतात.
त्यामुळे उदघाटनापूर्वीच इमारतीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येथे लवकर गेटची व्यवस्था करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.