डॉ. सूर्यकांत वरकड
तुझ्या माझ्या संसाराला आणीक काय व्हाय... दिस जातील दिस येतील... भोग सरल, सुख येईल या गाण्याप्रमाणे संसारात सुख-दुःख येतात. संकटे येतात; मात्र त्यात पती-पत्नी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. विश्वासाहर्ता टिकविली पाहिजे. किरकोळ कारणावरून टोकाचे पाऊल उचलणे संसारासाठी घातक ठरते. अशाच किरकोळ वादातून भरोसा सेलकडे कौटुंबिक कलहाच्या वर्षभरात 1564 तक्रारी आल्या होत्या. भरोसा सेलने समपुदेशन करून त्यातील 322 जोडप्यांचा संसार पुन्हा सुखी केला.
जिल्हा पोलिस दलाने पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक कलह सामोपचाराने मिटविण्यासाठी भरोसा सेल स्थापन केला. किरकोळ पती-पत्नीचा वाद, कौटुंबिक वाद झाला की नागरिक पोलिस ठाण्यात धाव घेतात. पण आता पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नाही. पती-पत्नी एकाच रथाची दोन चाके असतात. त्यांच्यामध्ये वाद होतात आणि मिटतातही. त्यामुळे त्यांना समपुदेशनाची गरज असते. पोलिस ठाण्यात तक्रारदार गेल्यानंतर पोलिस भरोसा सेलकडे पाठवितात.
भरोसा सेलकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर पती-पत्नी दोघांही बोलावून घेतले जाते. त्यांना समजावून सांगून पती-पत्नीचे नाते, वैवाहिक जीवनाचे महत्त्व समजावून सांगितलेे. तसेच, दोघांना समोरासमोर बसवून त्यांचे समपुदेशन केले जाते. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनाही बोलावून घेऊन संसार टिकण्याबाबत समपुदेशन केले जाते.
भरोसा सेलकडे गेल्या वर्षभरामध्ये सुमारे 1564 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 322 तक्रारींमध्ये पती-पत्नीचा समेट घडून आणण्यात भरोसा सेलला यश आले. तर, 404 तक्रारदारांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. 1238 अर्जावर सुनावणी घेऊन निर्गती करण्यात आली. अद्याप 261 प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
आजकाल विवाहाच्या अगोदर प्रीवेडिंग करण्याचा पायंडा पडला आहे. मात्र, असे प्रीवेडिंग करण्यापेक्षा मुला-मुलीने समपुदेशनाचे प्रीवेडिंग करून एकमेकांना समजून घेतले पाहिजे. किती उत्पन्न, घरात किती माणसे, मग कसे राहता येईल. गावात राहणार की नोकरीच्या ठिकाणी अशा गोष्टींची चर्चा केली तर विवाह नंतर वादविवादाचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यासाठी समपुदेशनाचे प्रीवेडिंग करणे गरजेचे आहे.
मोबाईल टाकतोय मिठाचा खडा
घरोघरी मातीच्या चुली, असे आपण म्हणतो. तसे प्रत्येकाच्या घरात पती-पत्नीचे वाद होतात. पण ते काही काळात मिटतात. पण आजकाल वाद मिटण्याचे प्रमाण कमी होताना दिसते. मोबाईल हे दुधारी अस्त्र झाले आहे. अनेकांचे संसारांत मोबाईलमुळे मिठाच्या खडा पडल्याचे चौकशीत समोर आले. मोबाईलमुळे अनेकांच्या संसाराचा काडीमोडही झाला आहे.