पुणे

नसरापूर : भरधाव ट्रॅव्हल्स बसची ट्रेलरला जोरदार धडक; सात प्रवासी जखमी

अमृता चौगुले

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा: पुणे-सातारा महामार्गावरून जाणार्‍या ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती थेट महामार्ग ओलांडून विरुद्ध दिशेला जाऊन सेवारस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडकली. अपघातात बसचा चक्काचूर झाला असून, सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

फिरोज खोजा आतार, शमशादअली अजमतअली खान, नाहिरा नूर अय्यमद, सुधीर संजय साळुंके, मनोज चौथीलाल जाटप, मारिया (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. मुंबई), दिगंबर लोटणीकर (रा. गोवा) अशी जखमींची नावे आहेत. घटना सारोळा (ता. भोर) गावच्या हद्दीत सातारा-पुणे महामार्गावर शनिवारी (दि. 8) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. बसमध्ये अंदाजे 30 प्रवासी होते.

यातील पाच जखमी सिद्धिविनायक हॉस्पिटल (नसरापूर), जोगळेकर हॉस्पिटल (शिरवळ), तर एक जण जहांगीर (पुणे) येथे उपचार घेत आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र वास्को (गोवा) येथे कामानिमित्त गेले होते. मुंबईकडे परतत असताना अचानक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅव्हल्स बस (जीए 07 एफ 8975) ही दुभाजक ओलांडून पुणे ते सातारा महामार्ग रस्ता पार करून सेवारस्त्यावर उभ्या ट्रेलरला (एमआर 55 क्यू 1903) समोरून जोरदार धडक दिली.

या वेळी किकवी दूरक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक दिनेश गुंडगे, नाईक नाना मदने, गणेश लडकत आदींनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. बसचालक भरत भूषण पुजारी (रा. अंधेरी पूर्व, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT