DIwali Pahat File Photo
पुणे

Diwali Pahat | भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा यांची पुण्यात प्रथमच रंगणार दिवाळी पहाट

दैनिक 'पुढारी'च्या वतीने समस्त पुणेकरांसाठी बहारदार सांगीतिक मेजवानी

पुढारी वृत्तसेवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यामध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम सादर करण्याची परंपरा १९९१ मध्ये पुण्यभूषण फाउंडेशनने सुरू केलेल्या दिवाळी पहाटपासून आजतागायत गेल्या ३३ वर्षांपासून सुरू आहे. यंदाची दिवाळी पहाट मात्र समस्त पुणेकर रसिकांसाठी आगळीवेगळी ठरणार आहे.

कारण या वर्षी 'पुढारी' माध्यम समूहाने भजनसम्राट, प्रसिद्ध गायक पद्मश्री अनुप जलोटा यांची सूरमयी दिवाळी पहाट आयोजित केली आहे. पुण्यात आयोजित केल्या जाणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमात श्री. अनुप जलोटा प्रथमच सहभागी होत आहेत.

पुणे हे विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. वर्षभर पुण्यात अनेक सण आनंदाने, उत्साहाने साजरे होत असतात. याच सणांमधील दिवाळी पहाट हा पुणेकरांसाठी खूप उत्साहाचा आणि विविधतेने नटलेला सोहळा असतो.

logo

विविध ठिकाणी दिवाळी पहाटनिमित्त अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने सांगीतिक मैफिलींचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होत असते. राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेले पुण्यातील नागरिक अशा दिवाळी पहाट कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहात असतात.

कार्यक्रमात कोण सादरीकरण करणार हे पाहून पुणेकर त्यांची कार्यक्रमपत्रिकाही तयार करतात. पुणेकरांची ही सांस्कृतिक भक्ती जपण्यासाठी 'पुढारी' माध्यम समूहाने गेली ५० वर्षे तमाम रसिकांना आपल्या भक्तिसंगीताच्या भजन स्वरांनी मंत्रमुग्ध करण्याचा मापदंड गाठणारे प्रसिद्ध गायक, भजनसम्राट पद्मश्री अनुप जलोटा यांची दिवाळी पहाट आयोजित केली आहे.

आजपर्यंत अनेक कलाकारांनी आपल्या गायकीने, संगीताने पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रम सादर केले आहेत. पण पद्मश्री अनुप जलोटा हे मात्र पुण्यात पहिल्यांदाच दिवाळी पहाट कार्यक्रम सादर करणार आहेत.

तेही दैनिक 'पुढारी'च्या व्यासपीठावर ! भजन गायक पुरुषोत्तमदास जलोटा यांचे पुत्र असणारे अनुप जलोटा हे पंजाबमधील प्रसिद्ध शाम चौरासी घराण्यातील गायक आहेत. ऑल इंडिया रेडिओवर त्यांनी आपल्या गायकीची सुरुवात केली. त्यांच्या सादरीकरणाने तसेच श्रवणीय भजनांमुळे भक्तिसंगीत विश्वातील एक अढळ तारा म्हणून आपले स्थान मिळवले आहे.

'ऐसी लागी लगन... रंग दे चुनरिया....' 'मेरे मन में राम तन मे राम....' 'प्रभूजी तुम चंदन हम पानी....' 'मैय्या मोरी मैं नही माखन खायो...' अशा विविध सुंदर भजनांमुळे ते समस्त रसिकांच्या घराघरात पोचलेले आहेत आणि त्यांच्या या वैविध्यपूर्ण भजनांनी रसिकांच्या मनात घर केले आहे.

अशा या लोकप्रिय भजनसम्राट कलाकाराची दिवाळी पहाट म्हणजे समस्त पुणेकरांसाठी अतिशय आनंदाची पर्वणी असणार आहे. अशा या सुरेल सांगीतिक मेजवानीचा आस्वाद पुणेकर रसिकांनी नक्कीच घ्यावा, असे आवाहन दै. 'पुढारी' तर्फे करण्यात आले आहे.

आजपर्यंत मी अनेक शहरांमध्ये अनेक कार्यक्रम सादर केले आहेत, परंतु यंदा पुण्यात पुणेकर रसिकांसमोर आणि तेही दिवाळी पाडव्याच्या दिवशी 'पुढारी'तर्फे भक्तिमय संगीत सादर होणार आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे.
अनुप जलोटा, भजनसम्राट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT