पुणे

पुणे : गोळीबार मैदान ते खडीमशिन चौकदरम्यान दिवे नावालाच!

अमृता चौगुले

महेंद्र कांबळे

पुणे : शहरात रस्त्यावरील दिव्यांची अवस्था दयनीय झाली असून, गोळीबार मैदान चौक ते खडीमशिन चौकादरम्यान दिवे आहेत. मात्र त्याखाली अंधार दाटलेला आहे. गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी कोंढवा परिसरात तर ठरावीक अंतरावर उंचावरच हॅलोजनसारखे पथदिवे आहेत. परंतु, या मोठ्या दिव्यांचा उजेड मिणमिणत्या दिव्यासारखा आहे. लुल्लानगर चौक ते गोळीबार मैदानापर्यंत 108 पथदिवे आहेत. मात्र त्यातून पुरेसा उजेड पडत नाही. त्यामुळे चोरी, लुटमारीच्या घटना घडण्याची भीती असते. यामुळे इथे असुरक्षिततेचे वातावरण आहे.

लुल्लानगरकडून गोळीबार मैदान चौकाकडे जाताना डाव्या बाजूला, तर कमांड हॉस्पिटलची हद्द सुरू होताना दोन्ही बाजूला पथदिवे आहेत. परंतु, या दिव्यांचा प्रकाश अत्यंत अपुरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज पूल संपल्यानंतर गोळीबार मैदानाकडे जाताना तर शंभर मीटर अंतरावर अंधारच असल्याचे दिसते, तर दिव्यांच्या आजूबाजूला असलेल्या झाडांमुळे प्रकाशच रस्त्यावर पडत नाही.

लुल्लानगर ते खडीमशिन चौकापर्यंत ठरावीक अंतरावर असलेले पथदिवेच नाहीत. केवळ उंचावरील हॅलोजनसारखे दिवे चौकातच उजेड देताना दिसतात. परंतु, दिव्यांच्या लांब असलेल्या अंतरामुळे अंधारमयच परिस्थिती आहे. इथे आजूबाजूला वर्दळीचा परिसर असल्याने घरे आणि दुकानांतील उजेड रस्त्यावर पडतो तोच नागरिकांसाठी पथदिव्यांचे काम करीत आहे.

कोंढवा पोलिस ठाणे ते खडीमशिन चौक या भागात अंधारच असल्याचे दिसून येते. खडीमशिन चौक ते हांडेवाडी चौकदरम्यान 50 ते 60 दिवे आहेत. त्यातीलही बरेच दिवे बंद असून, संपूर्ण कात्रज ते सासवडला जोडणार्‍या महामार्गावर अंधारच आहे. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असल्याचे पाहायला मिळते. परंतु, भविष्यात येथे पथदिव्यांबाबत लक्ष न दिल्यास एखाद्या मोठ्या दुर्घटनेला किंवा अपघाताला नागरिकांना सामोर जावे लागू शकते. तसेच कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीदेखील बोकाळली असताना सीसीटीव्ही असले तरी अंधारामुळे आरोपींचा माग काढण्यात यश येऊ शकत नाही. हेच पथदिवे चांगला प्रकाश देत असते, तर उजेडाच्या आधाराने गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढू शकले असते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT