पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'मला सवाई गंधर्व-भीमसेन महोत्सवात गायनाची संधी मिळत आहे, याचा आनंद आहे. या महोत्सवात सादरीकरणाची जी संधी मिळणार आहे, त्यातून माझ्या गुरुंनी माझ्यावर जे कष्ट घेतले त्याचं चीज झालं असं मला मनोमन वाटतंय. अनेक मोठ्या कलाकारांनी या ठिकाणी आपली कला सादर केली असल्याने ते 'पॉवरफुल' झालयं. हे केवळ सादरीकरण नाही तर आमच्यासारख्या पुढच्या पिढीवर टाकलेली एक जबाबदारी आहे असे मी मानते,' ही भावना आहे सवाईत पहिल्यांदा कला सादरीकरणासाठी सज्ज असलेल्या गायिका यशस्वी सरपोतदार यांची.
दोन वर्षांनंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा स्वरयज्ञ बुधवारपासून (दि. 7) रंगणार आहे. यंदा महोत्सवात अनेक कलाकार पहिल्यांदाच सादरीकरण करणार असून, त्यांच्यात कमालीची उत्सुकता आहे. त्यातीलच एक म्हणजे यशस्वी सरपोतदार. त्यांनी महोत्सवात सादरीकरण करण्याचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद व्यक्त केला असून, त्यांच्याप्रमाणे इतर कलाकारही सादरीकरणासाठी सज्ज आहेत. पहिल्यांदाच महोत्सवात कलाप्रस्तुतीची मिळाल्यामुळे आनंदासह दडपण आणि जबाबदारीच्या मिश्र भावना कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत.
दिल्लीस्थित किराणा घराण्याचे गायक अविनाश कुमार म्हणाले, 'हा महोत्सव जगभरातील सर्वांत मोठा शास्त्रीय संगीत महोत्सव आहे. हा महोत्सव सुरू करणारे पं. भीमसेन जोशी हे एकमेवद्वितीय असे कलाकार होते, ते संगीताचे व कित्येक पिढ्यांच्या गायकांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे महोत्सवात कलाप्रस्तुतीची संधी मिळणे हे माझ्या आयुष्यभराचे भाग्य आहे.
बनारस घराण्याचे ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र प्रसन्ना यांनी याआधी पुण्यात अनेकदा आपले बासरीवादन सादर केले आहे, मात्र, या महोत्सवात ते प्रथमच कलाप्रस्तुती करणार आहेत.
पं . भीमसेन जोशी यांसारख्या मोठ्या कलाकाराने ज्या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली त्या महोत्सवात सादरीकरणाची संधी मला यावर्षी मिळत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. असे सांगत ते म्हणाले, पुण्यामध्ये सादरीकरण करणे म्हणजे आम्हा कलाकारांसाठी भाग्याची गोष्ट असते, कारण कलकत्ता, बनारस आणि पुणे या ठिकाणाचे रसिक हे चोखंदळ आणि जाणकार आहेत. महोत्सवात माझ्यासोबत माझी मुले राजेश व रिषभ ही देखील सहभागी होणार आहेत. गायकी अंगाने बनारसी शैलीतील बासरीवादनाची झलक आम्ही पुणेकरांना दाखवणार आहोत.
'पुण्यातील रसिकांसमोर माझे हे पाहिलेच सादरीकरण असेल. किराणा घराण्याची गायिका असल्याने पंडितजींनी सुरू केलेल्या महोत्सवात गायनसेवा सादर करण्याची संधी माझ्यासाठी आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा अनुभव आहे,' अशा भावना कोलकातास्थित किराणा घराण्याच्या गायिका मनाली बोस यांनी व्यक्त केल्या.