पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई या जुन्या महामार्गावरील निगडी ते दापोडी या 12.50 किलोमीटर अंतराचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यांवरील दुभाजक व पदपथाच्या बाजूने फुलझाडे व हिरवळ लावून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या दीड वर्षांच्या कामासाठी 1 कोटी 18 लाख खर्च करण्यात येणार आहे.
निगडी ते दापोडी हा शहराचा मुख्य मार्ग आहे. हा मार्ग स्वच्छ व सुंदर दिसावा म्हणून पालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी या मार्गाची नियमितपणे स्वच्छता करून रंगरंगोटी केली जाते. या 12.50 किलोमीटर रस्त्यांवरील दोन्ही बाजूचे दुभाजक, ग्रेडसेपरेटर आणि रस्त्यांच्या बाजूने झाडे, फुलझाडे व हिरवळ लावून सुशोभीकरण करणे व त्यांची देखभाल व निगा राखणे या कामासाठी उद्यान विभागाने 1 कोटी 24 लाख खर्चाची निविदा काढली होती.
त्यासाठी 5 ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यातील न्यू गार्डन गुरूज फार्म आणि नर्सरी, जी. बी. एंटरप्रायजेस आणि तावरे कॅन्स्ट्रक्शन कंपनी या तीन निविदा पात्र ठरल्या. त्यातील न्यू गार्डन गुरूज फर्म आणि नर्सरीची 5.10 टक्के कमी दराची 1 कोटी 17 लाख 46 हजार खर्चाची निविदा स्वीकारण्यात आली आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.