पुणे

पुणे : वडगावात स्मशानभूमीचे सुशोभीकरण ; संरक्षक भिंतीच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष

अमृता चौगुले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. मात्र, पुरात वाहून गेलेल्या संरक्षक भिंतीच्या उभारणीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. नागरिकांकडून याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. तीन वर्षांपूर्वी ओढ्याच्या पुरात स्मशानभूमीची ओढ्यालगतची संरक्षक भिंत वाहून गेली होती. अंत्यविधीसाठी आलेले नातेवाईक, नागरिक अनेकदा कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या आडबाजूला जातात. त्यामुळे पावसाळ्यात नागरिक
ओढ्यात कोसळून दुर्घटनांची भीती आहे. स्वच्छतागृहातील दिवेही अनेक महिन्यांपासून बंद आहेत.

स्मशानभूमीवरील पर्त्यांची दुरवस्था झाल्याने पावसाचे पाणी आत येत होते. संरक्षख कठडे, जाळ्या नसल्याने चोरट्यांचा उपद्रव वाढला होता, याकडे मनसेचे चंदन कड पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच, जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट पाटील व स्थानिक नागरिकांनी स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भवन विभागाचे सहायक अभियंता रामदास कड पाटील यांनी तातडीने पाहणी करीत सुशोभीकरणाची कार्यवाही सुरू केली. संरक्षक भिंतीच्या उभारणीसाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT