जमिनीच्या वादातून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल file photo
पुणे

जमिनीच्या वादातून मारहाण; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

आरोपी दोन ट्रॅक्टर व जेसीबी मशिन घेऊन आले होते.

पुढारी वृत्तसेवा

बारामती: जमिनीच्या मालकी हक्कावरून शिवीगाळ, दमदाटी, मारहाण केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाळासाहेब विश्वनाथ भांडवलकर (रा. करंजे, देऊळवाडी, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी राजेंद्र अरुण भांडवलकर, विवेक विलास भांडवलकर (दोघे रा. करंजे देऊळवाडी, ता. बारामती), चेतन नंदकुमार आगलावे (रा. थेऊर, ता. हवेली), राहुल पवार (रा. चौधरवाडी ता. बारामती), ट्रॅक्टरचालक (नाव माहीत नाही), रोहित पवार (रा. चौधरवाडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करंजे-देऊळवाडी येथील गट नं. 229 मध्ये ही घटना घडली. आरोपी दोन ट्रॅक्टर व जेसीबी मशिन घेऊन आले होते. तेथील झाडाझुडपाची साफसफाई करू लागले असता बाळासाहेब भांडवलकर तसेच त्यांची पत्नी छाया, मुलगा पंकज यांनी त्यांना या क्षेत्राबाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे.

त्याचा निकाल लागलेला नाही, तुम्ही या क्षेत्रात काही करू नका, असे सांगितले. त्यावर राजेंद्र भांडवलकर, विवेक भांडवलकर व इतरांनी बाळासाहेब भांडवलकर यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्का-बुक्की करून मारहाण केली. जेसीबीचालक राहुल पवार याने फिर्यादीचा मुलगा पंकज यास दमदाटी करून ढकलून दिले. ट्रॅक्टरचालकाने फिर्यादीस दमदाटी केली.

दुसरा ट्रॅक्टरचालक राहुल पवार यानेही फिर्यादी व त्यांची पत्नी, मुलगा यांना दमदाटी केली. क्षेत्राचा वाद असूनही आरोपींनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतात नांगरट केली. राजेंद्र भांडवलकर व विवेक भांडवलकर यांनी शेतातील पोलवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान केले असे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT