पुणे: शहरात होळीला होणार्या वृक्षतोडीच्या घटना लक्षात घेऊन त्या रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने दंडात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार होळी सण साजरा करण्यासाठी वृक्षतोड केल्यास एक लाखापर्यंत दंड वसूल करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून यासंबंधीचे जाहीर निवेदन दिले आहे. प्रामुख्याने होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. होळीसाठी वन विभागाच्या हद्दीत असलेली, तसेच नदीकाठ आणि आसपासच्या परिसरातील झाडे काही दिवस आधीच तोडून ती विक्रीसाठी ठेवली जातात; अथवा गुपचूपपणे वापरली जातात.
येत्या गुरुवारी (दि.13) साजरी होत असलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने वृक्षतोडीचे प्रकार रोखण्यासाठी आधीच उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण विभागाने दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
विनापरवाना वृक्षतोडीचे प्रकार घडत असल्यास अथवा घडलेले असल्यास नागरिकांनी तत्काळ महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिक 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर, 9689900002 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तक्रार करू शकतात. तसेच, 9689938523, 9689930024 या मोबाईल क्रमांकावरही तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
वृक्ष तोडल्यास या तरतुदीनुसार कारवाई
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम 2021 या कायद्यानुसार, विनापरवाना झाडे जाळणे, तोडणे किंवा कोणत्याही प्रकारे झाडास हानी पोहचविणे, असे कोणतेही कृत्य करणे हा गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी शासनाच्या सूचनेच्या सूत्रानुसार काढलेल्या मूल्याइतके; परंतु, एक लाख रुपयांपेक्षा अधिक नसेल इतक्या रकमेच्या दंडाची तरतूद आहे.