पुणे

बाजारवाडी राज्याच्या नकाशावर येईल : आ. संग्राम थोपटे

अमृता चौगुले

भोर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : 'रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी भवन उभारणार आहे. तीन मजली इमारतीत भक्त निवास, व्यापारी गाळे, पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून दिल्यास तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. पर्यटनादृष्टीने बाजारवाडी देश व राज्याच्या नकाशावर येईल,' असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

बाजारवाडी (ता.भोर) येथे रोहिडा किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी सोयीसुविधा करण्यासाठी 1 कोटी, बाजारवाडी – धावडी- निळकंठ रस्त्याच्या कामासाठी 40 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे, भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आनंद आंबवले, राजाराम तुपे, भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अतुल किंद्रे, संचालक संपत दरेकर, दिलीप वरे, अनिल सावले, सरपंच प्रमोद थोपटे, संतोष केळकर, बाजारवाडी सरपंच सीताबाई गुरव, बांधकाम विभागाचे अधिकारी प्रभाकर पाटील, योगेश मेटेकर आदींसह ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

बाजारवाडी- धावडी-निळकंठ या रस्त्याच्या कामासाठी 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे. रस्त्याचे काम होण्याआधी गटारांची कामे पूर्ण करून रस्ता चांगल्या पद्धतीने ग्रामस्थांनी करून घ्यावा. हातनशी ते निळकंठ- बाजारवाडी धावडी, मानकरवाडी – नाझरेपर्यंत रस्ता मंजुरीसाठीही पाठपुरावा सुरू आहे. बाजारवाडीसाठी जलजीवन मिशनअंतर्गत दोन कोटी निधी, 60 लाख साकव, अंतर्गत काँक्रीटीकरण, व्यायाम शाळा, सभागृह या कामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाल्याचे आमदार थोपटे यांनी या वेळी सांगितले.

तीन टक्के निधी पर्यटन कामासाठी

भोर मतदारसंघात रोहिडेश्वर, रायरेश्वर, तोरणा, राजगड, तिकोना आदी किल्ले असून, प्रत्येक गडावरील ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, गडाचे सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजनच्या अर्थसंकल्पीय 1100 कोटींच्या मंजूर निधीतून 3 टक्के निधी पर्यटन विकासकामांसाठी तरतूद केल्यामुळे गड संवर्धन कामासाठी 30 ते 35 कोटी रुपये मिळणार आहेत, असे आमदार थोपटे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT