Chandrashekhar Bawankule  Pudhari
पुणे

Chandrashekhar Bawankule | रवींद्र धंगेकरांनी बुद्धी सांभाळून बोलावे : बावनकुळे

महाराष्ट्राच्या जनतेचा कौल समजून घेण्याची गरज असून, निवडणुकीतील विजय-पराभवावरून राजकीय दावे करताना संयम बाळगावा, असा सल्लाही त्यांनी धंगेकर यांना दिला.

पुढारी वृत्तसेवा

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्वतःची बुद्धी सांभाळून बोलावे. अशा विषयांवर भाष्य करण्याइतकी त्यांची राजकीय उंची नाही, अशी टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जनमतातून निवडून आले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल समजून घेण्याची गरज असून, निवडणुकीतील विजय-पराभवावरून राजकीय दावे करताना संयम बाळगावा, असा सल्लाही त्यांनी धंगेकर यांना दिला.

पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणुकीत झालेला पराभव मान्य असून त्यामागील कारणांचा शोध घेतला जाईल. महायुतीतील कोणत्या घटकांनी अपेक्षेप्रमाणे काम केले नाही, याचाही आढावा घेतला जाणार आहे. नागपूरच्या जागेचा प्रभारी असल्याने तेथील पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. पक्षनेतृत्वाच्या सूचनांनुसार काम झाले नसल्याचे किंवा पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे आढळल्यास संबंधितांना समज दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर आणि पुणे या दोन्ही जागा प्रतिष्ठेच्या होत्या. पराभवाचा आढावा घेताना केवळ यशाचे प्रमाण विचारात घेतले जाणार नाही. मतदारांनी मतदान का केले नाही आणि त्यांच्या मनात नेमकी काय भूमिका होती, याचाही अभ्यास केला जाईल. पुण्यातील शिक्षक मतदारसंघाची जागा आम्ही जिंकली असून तेथे मैत्रीपूर्ण लढत होती, असे बावनकुळे म्हणाले.

मतपत्रिकेवरील मतदानाच्या निकालानंतर काँग्रेसने केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. मतपत्रिकेवर मतदान झालेल्या ठिकाणी भाजप विजयी झाला आहे. मात्र नागपूरमध्ये पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तेव्हा मतदान यंत्रांबाबत प्रश्न उपस्थित झाले नाहीत. विधानसभेत भाजप विजयी झाल्यानंतर मात्र यंत्रांवर आक्षेप घेण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. मतदारयाद्या वारंवार नव्याने तयार करण्याऐवजी सध्याच्या यादीत आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात. मृत व्यक्तींची नावे वगळणे आवश्यक असले, तरी संपूर्ण यादी रद्द करणे योग्य नाही. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्जत येथे राज ठाकरे यांनी केलेल्या राजकीय भाषणाबाबत विचारले असता, कर्जतसारखे प्रकल्प राज्यात ५० ठिकाणी उभे राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विकासाबरोबर वृक्षांचे संवर्धनही झाले पाहिजे, असे सांगत कोयना प्रकल्पामुळे ग्राहकांना सुमारे दीड रुपये दराने वीज उपलब्ध होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. शेतकर्‍यांना दिली जाणारी पाच हजार रुपयांची मदत अंतिम नसून अग्रीम स्वरूपाची आहे. दुष्काळी परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जात आहेत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT