पुणे

वाल्हेकरवाडीत पाच तास बत्ती गुल

अमृता चौगुले

पिंपरी : आकुर्डी येथील वाल्हेकरवाडी व गुरुद्वारा परिसरात शुक्रवार (दि. 18) सकाळी पाच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली. या परिसरात विविध कार्यालये, शाळा, महाविद्यालये असल्याने शुक्रवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू होता. केवळ फ्यूज खराब झाल्याने वीजपुरवठा पाच तास खंडित झाल्याने महावितरणचा गलथान कारभार दिसून आला.

वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा परिसर मोठा आहे. तसेच या परिसरात अनेक महाविद्यालये इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक कॉलेज तसेच वर्क फ—ॉम होम करणारेही अनेक कर्मचारी आहेत. त्यांना सर्वात जास्त विजेची गरज भासते. नागरिकरण मोठ्या प्रमाणात असल्याने येथील डीपीवर लोड येत असून, येथे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हिवाळ्यात सकाळी गिझर जास्त प्रमाणात सुरू असल्याने; तसेच या भागात नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने सध्याच्या एका मडीपीफ वर अतिरिक्त भार होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. या डीपीची क्षमता वाढविण्यासाठी कपॅसिटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे उपअभियंता कल्याण जाधव यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी सातपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. याविषयी तक्रार निवारण केंद्राला दोनवेळा फोन केला. त्यानंतर उशिरा दखल घेतली. एक दिवस उशिरा वीजबिल भरल्यास घराचा वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांच्या तक्रारीची देखील लवकर दखल घेतली जात नाही.
                                           – राफेल पगारे, नागरिक, वाल्हेकरवाडी.

SCROLL FOR NEXT