बारव, डिंगोरे, शिनोली, वाडा, टाकवे बु. गट होणार अनुसूचित जमातीसाठी आरक्षित; इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरणार  Pudhari
पुणे

Gram panchayat Seats: बारव, डिंगोरे, शिनोली, वाडा, टाकवे बु. गट होणार अनुसूचित जमातीसाठी आरक्षित; इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरणार

नव्याने व लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांसाठी या वेळी पूर्णपणे नव्याने व लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने आरक्षण निश्चित होणार आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची आकडेवारी व उतरता क्रम लक्षात घेतला, तर जुन्नर तालुक्यातील बारव, डिंगोरे, आंबेगाव या तालुक्यांतील शिनोली, खेड तालुक्यातील वाडा आणि मावळ तालुक्यांतील टाकवे बु. हे गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, नवीन नियमानुसार खेड तालुक्यातील वाडा व वाडा-वाशेरे दोन्ही गण देखील लोकसंख्येनुसार अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होतील. हीच स्थिती अन्य तालुक्यांत देखील होण्याची शक्यता आहे. (Latest Pune News)

जिल्हा परिषद गटांचे व पंचायत समितीच्या गणांची रचना अंतिम झाली आहे. इच्छुकांना आरक्षणाचे वेध लागले आहेत. तीन वर्षांच्या विलंबानंतर निवडणुका होत असल्याने सर्व पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांची गणिते आरक्षणावर अवलंबून आहेत. इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

शासनाने जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणांची फेररचना केली असून, आरक्षण निश्चित करताना यापूर्वीचे सर्व आरक्षण संपुष्टात आणत पूर्णपणे नव्याने व लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाकाने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने गटांची अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीची लोकसंख्या व उतरता क्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीचे आरक्षण जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

पुणे जिल्ह्यात अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळ तालुक्यात आहे. तर अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या इंदापूर, बारामती, दौंड आणि हवेली या तालुक्यांत आहे. यामुळेच हे आरक्षण देखील याच तालुक्यांमध्ये पडणार हेदेखील निश्चित आहे. लोकसंख्येनुसार अनुसूचित जातीसाठी 7 जागांवर, तर अनुसूचित जमातीसाठी 5 जागा आरक्षित होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात, तर पंचायत समित्यांच्या गणांचे

आरक्षण त्या-त्या पंचायत समितीत सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता आरक्षणाकडे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT