पुणे

Ashadhi wari 2023 : सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामतीकर सज्ज

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (दि. 18) बारामती मुक्कामी येत आहे. सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामतीकर सज्ज झाले आहेत. नगर परिषदेनेदेखील पूर्वतयारी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, शारदा प्रांगणात पालिकेच्या वतीने भव्य मंडप उभारण्यात आला आहे. पावसामुळे व्यत्यय येऊ नये यासाठी या मंडपावर पत्रा टाकण्यात आला आहे. दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांग तयार करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या शामियान्याजवळच संस्थानसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

याशिवाय पोलिस प्रशासन, नगरपरिषदेचा आरोग्य व अग्निशमन विभाग व एनडीआरएफ यांच्यासाठीही शामियाना उभारण्यात आला आहे. पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी तसेच शारदा प्रांगण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नगरपरिषदेच्या शाळेच्या खोल्या दिंड्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पालखी सोहळा शनिवारी (दि. 17) बारामती तालुक्यातील उंडवडी येथे मुक्कामी असेल. रविवारी सायंकाळी बारामती शहरातील पाटस रस्त्यावर सोहळ्याचे स्वागत केले जाणार आहे. शहरात 45 ठिकाणी नगरपरिषदेची सार्वजनिक शौचालये आहेत. याशिवाय 1200 स्वतंत्र फिरती शौचालये शासनाकडून उपलब्ध झाली आहेत.

पालखी सोहळ्यात सहभागी दिंड्यांचे टँकर शुद्ध पाण्याने भरण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात दोन ठिकाणी, नगरपरिषद पाण्याच्या टाकीजवळ व अवचट इस्टेट येथे व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सर्वच भागातील पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागाने स्वच्छता केली आहे. पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.

निवास, भोजनाची व्यवस्था
बारामतीत विविध मंडळांकडून सोहळ्यातील वारकरी, दिंड्या यांच्यासाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी भव्य कमानी उभारण्यात आल्या आहेत. पाणी, वीज, वैद्यकीय पथके, फिरते शौचालये, कचराकुंडी, पोलिस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, सूचना फलक आदी व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील साफसफाई करण्यात आली आहे.

वाहतूक व्यवस्थेत बदल
पालखी सोहळ्यामुळे बारामती शहर व बाह्यमार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जड वाहनांना प्रवासासाठी रिंग रोडचा वापर करावा लागणार आहे. शहरातील सर्वच प्रमुख रुग्णालयाच्या वतीने वारकर्‍यांना सेवासुविधा पुरवण्यासाठी मोफत वैद्यकीय तपासणी कक्ष उभारण्यात आले आहेत.

 हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT