बारामती: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तालुक्यात 299 केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी माहिती दिली.
बारामती तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीचे 12 गण असून, एकूण 299 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तालुक्यात 1 लाख 35 हजार 74 पुरुष आणि 1 लाख 29 हजार 560 महिला व इतर 9 असे एकूण 2 लाख 64 हजार 642 मतदार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली असून, आचारसंहिता काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रचारासाठी सभा, मिरवणूक व रोड शो यांची परवानगी पोलिस प्रशासनाकडून दिली जाणार आहे. बॅनर व फलकांसाठी ग््राामपंचायतीकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. प्रचार वाहने व इतर बाबींसाठी प्रांत कार्यालयाकडून परवानगी देण्यात येणार आहे. जाहिरातींसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक राहील.
उमेदवार एका जागेसाठी चार अर्ज भरू शकणार असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन स्वरूपात राहणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 1 हजार रुपये, तर इतर प्रवर्गांसाठी 500 रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. पंचायत समितीसाठी ही रक्कम अनुक्रमे 700 रुपये व 350 रुपये आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच सूचक आवश्यक राहणार आहे.
या निवडणुकीसाठी 16 ते 21 जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 23, 24 व 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. यावेळी उमेदवार स्वतः किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाची मर्यादा जिल्हा परिषदेसाठी 9 लाख रुपये, तर पंचायत समितीसाठी 6 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी बारामती येथील क्रीडा संकुलात होणार असून, मतदार याद्या ऑनलाईन उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
वडगाव निंबाळकर गटात सर्वाधित मतदार
तालुक्यातील वडगाव निंबाळकर गटात सर्वाधिक 45 हजार 708 मतदार आहेत. सुपा गटात 45 हजार 223, गुणवडी गटात 42 हजार 209, पणदरे गटात 44 हजार 422, निंबूत गटात 41 हजार 958 व निरावागज गटात 45 हजार 122 एकूण मतदार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.