Baramati Water Crisis Pudhari
पुणे

Baramati Water Crisis: बारामतीच्या जिरायत पट्ट्यातील तलाव कोरडेठाक

जून महिना सरला; पेरणी लांबणीवर, शेतकरी-पशुपालक चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

लोणी भापकर: बारामती तालुक्यातील पळशी, वाकी, कानाडवाडी, मोराळवाडी परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, बहुतांश विहिरींनी तळ गाठला आहे. जून महिना संपत आला, तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आणि पशुपालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. शेतातील मका, कडवळ, जनावरांच्या चाऱ्याची पिके तसेच विविध भाजीपाला करपण्यास सुरुवात झाली आहे.

या परिसरातील प्रमुख जलस्रोत असलेला वाकी पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडला असून, त्याची पाणीपातळी शून्य टक्क्यावर आली आहे. त्यामुळे वाकी, पळशीसह परिसरातील पाझर तलावांमध्ये पुरंदर उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडून तलाव भरावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या भागांत पाण्याची कमतरता जाणवत होती. मात्र, आता परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. बहुतांश विहिरी कोरड्या पडल्याने शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. आकाशात ढग आणि वारे दिसत असले, तरी पावसाचा पत्ता नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पळशी परिसरातील महानवरकी, गावठाण, करेवस्ती, गडदरेवस्ती, बरकडेवस्ती, खोरीचा, इजगुडे आणि काळवटीचा पाझर तलाव तसेच वाकी धरण, या जलस्रोतांवर परिसरातील शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. या जलस्रोतांच्या परिसरातील विहिरी देखील कोरड्या पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

संपूर्ण परिसर जिरायत स्वरूपाचा असल्याने येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला असून, अनेक पशुपालकांना विकतचा चारा आणावा लागत आहे.

वाढत्या खर्चामुळे पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडला आहे. शेळ्या-मेंढ्यांसाठीही चाराटंचाई निर्माण झाल्याने मेंढपाळांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ऐन पावसाळ्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर मोठे संकट उभे राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT