बारामती : बारामती शहरात काही दिवसांपासून वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठा, बसस्थानक परिसरात दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलिसांकडे नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.(Latest Pune News)
सोमवारी (दि. 27) शहरातील शिवाजी चौक ते बसस्थानक हा परिसर वाहतूक कोंडीत अडकला होता. याशिवाय महावीर पथ मार्गासह स्टेशन रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी एकही पोलिस कर्मचारी या परिसरात तैनात नव्हता. त्यामुळे या कोंडीत अनेक वाहने तासनतास अडकून पडली. सिनेमा रोड, स्टेशन रस्ता, महावीर पथ, अहिल्यादेवी चौक ते गुणवडी चौक, गुणवडी चौक ते शिवाजी चौक आणि कसबा परिसरातील कारभारी सर्कल, तांदूळवाडी रस्त्यावरील सातव चौक या भागात कायमच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
छोट्या अंतरासाठी नागरिकांना अर्धा तासाहून अधिक वेळ लागतो. रस्त्यांवरील अस्ताव्यस्त पार्किंग, रिक्षा आणि दुचाकींचे मनमानी थांबे, तसेच वाढलेली अतिक्रमणे यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. चौकामध्ये काही काळ हजेरी लावल्यानंतर वाहतूक पोलिस गायब होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांवर कोणाचेच नियंत्रण नसल्याची स्थिती आहे.
दरम्यान, काही व्यापाऱ्यांनी शहरात स्वतःकडील कर्मचा-यांसाठी सुद्धा पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. त्यांच्याकडे काम करणा-या अनेक कर्मचा-यांच्या दुचाकी रस्त्यावर लागतात. त्यातून व्यापारपेठेत खरेदीसाठी येणा-या ग््रााहकांनी वाहने लावायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. फेरीवाल्यांनी मनाला वाटेल तेथे दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढला आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची वाहतूक शाखेतून तालुका पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतर वाहतूक विभाग कमालीचा सुस्तावला आहे. वाहतूक व्यवस्थेचे नियोजन होण्यासाठी शहरातील प्रमुख चौकांत कायमस्वरुपी पोलिस कर्मचारी तैनात असणे आवश्यक आहे. याशिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. अद्याप शाळा-महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. ती सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक आणखी वाढणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.