आवक वाढली; पण दर कमीच
शेतकर्यांवर आर्थिक संकट
शेतकरी बागा तोडण्याच्या विचारात?
काटेवाडी : बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांत तैवान पिंक पेरूच्या बागांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पेरूची आवक वाढली आहे. याचा परिणाम थेट पेरूच्या दरावर झाला आहे. सध्या पेरूचे दर 10-15 रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. त्यातून खर्चही निघत नसल्याने पेरू उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. (Pune Latest News)
तालुक्यात पेरू पिकाखालील क्षेत्रात गेल्या वर्षा दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अधिक उत्पन्न देणार्या तैवान वाणाची लागवड शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. या पेरूला गौरी-गणपती उत्सवात भाववाढीची अपेक्षा होती. मात्र आवक जास्त झाल्याने पेरूला अपेक्षित दर मिळाला नाही. उत्पादन जादा झाले आणि उठाव नसल्याने सप्टेंबर महिन्यात पेरूला मातीमोल दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या बाजारात पेरूची वाढलेली आवक आणि परराज्यातील मोठ्या शहरांमध्ये पावसामुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे भावात मोठी घसरण झाली आहे. तैवान पिंक पेरूच्या बागांचा खत, व्यवस्थापन, फळांना प्लास्टिक पिशव्या बसविणे, काढणी आणि फोमचा खर्चही सध्याच्या भावातून भरून निघत नाही.
तैवान पिंक पेरूच्या भावात घसरण असताना पांढर्या पेरूस प्रतिकिलो 25 ते 30 रुपये आणि रेड पेरूस 50 ते 60 रुपये याप्रमाणे भाव मिळत आहे. तालुक्यात तैवान पिंक पेरू लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. सणासुदीच्या काळातच दर पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे काटेवाडी येथील पेरू उत्पादक शेतकर्यांनी सांगितले.
भाव घसरणीमुळे अनेक शेतकरी पेरूच्या बागा काढून टाकण्याचा विचार करत आहेत. पेरू हा नाशवंत माल आहे. त्याचा फायदा व्यापरी वर्ग घेतात. त्यामुळे दर मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च मोठा आणि मिळणारा दर कमी असल्याने आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे पेरूची बाग तोडल्याचे ढेकळवाडी, खताळपट्टा येथील शेतकरी शेखर ठोंबरे यांनी सांगितले.