बारामती : बारामती येथील राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर बारामती विमानतळ परिसरात रविवारी (दि. १८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या अज्ञात हल्लेखोराने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या एका हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्याला हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी राणा सूर्यवंशी हे बारामती विमानतळ परिसरात असताना हा प्रकार घडला. यावेळी एक अज्ञात व्यक्ती पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ आली. त्यानंतर अचानक धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला करून हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या एका हाताला गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने बारामतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रुग्णालय परिसरातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. हल्ल्यामागील कारण आणि हल्लेखोराची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
यापूर्वीही झाला होता हल्ला
राणा शिपिंग कंपनीचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावर यापूर्वीही जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या ताज्या हल्ल्यामागील कारणाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.