बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यात परतीच्या पावसाने तब्बल 3 हजार 745 हेक्टरवरील उभ्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी सांगितले. गेल्या महिनाभरापासून बारामती तालुक्यात धुंवाधार पाऊस होत आहे. जिरायती भागातही पावसाचा जोर कायम असून तालुक्यातील कर्हा व निरा नद्यांना पूर आलेला आहे. अनेक जिरायती गावात एकाच दिवशी 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. अचानक पाऊस पडल्याने नुकसानीची तीव्रता वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
बारामती तालुक्याची पावसाची सरासरी 389 मिलीमीटर इतकी आहे. अनेक ठिकाणी या सरासरीच्या तिप्पट पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्यात व आता परतीच्या पावसानेही बारामतीत जोरदार हजेरी लावली. दरम्यान दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीनंतर बारामती तालुक्यात कृषी विभागाने केलेल्या पाहणीत प्राथमिक अंदाजानुसार 3745 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
झाले आहे.
बारामती तालुक्यात खरिपाचे (उसाचे क्षेत्र पकडून) 27 हजार 111 हेक्टर तर रब्बीचे 13 हजार 900 हेक्टर क्षेत्र मका, ज्वारी व सूर्यफूल आदी पिकांखाली आहे. त्यापैकी 3 हजार 745 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृषी विभागाने पाणी ओसरू लागले आहे अशा ठिकाणी पंचनामे सुरू केले असून, जेथे पाणी आहे तेथे पाणी ओसरल्यानंतर पंचनामे केले जाणार आहेत.
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार बारामती तालुक्यात कांदा व इतर भाजीपाला 1 हजार 500, सोयाबीन- 650, ज्वारी- 650, बाजरी- 500, सूर्यफूल 108 चारा पिके 50 तर उसाचे 37 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा प्राथमिक अंदाज असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पाणीच असल्याने अद्याप अंदाज घेणे शक्य झालेले नाही. त्यात पावसाने अजूनही पाठ सोडलेली नाही. त्यामुळे या नुकसानीच्या आकड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.