बारामती: भाडेकरू नसतानाही, तुमच्याकडे भाडेकरू असल्याने मालमत्ता करात वाढ का करू नये? अशा नोटिसा शहरातील काही मिळकतधारकांना आल्या आहेत. त्यामुळे मिळकतधारकांनी पालिकेच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली. पालिकेने हे काम अमरावतीच्या एजन्सीला दिले आहे. ही एजन्सी कोणतीही खातरजमा करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
केंद्र, राज्य शासनाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणावर विकासकामांसाठी निधी मिळतो. मालमत्ता कराद्वारेही पालिका मोठा कर गोळा करत असते. परंतु, आता भाडेकरू नसताना भाडेकरू आहे म्हणून मालमत्ता कर का वाढू नये? अशा अनेक घरमालकांना बारामती नगरपरिषदेने नोटीस दिली असल्याने नागरिक नोटीसला वैतागले असून, संताप व्यक्त करत आहेत. (Latest Pune News)
एखाद्या मिळकतधारकाने दोन मजली घर बंगला स्वतःसाठी बांधल्यानंतर खाली व वर त्यांचेच कुटुंब राहत असतानासुद्धा खाजगी एजन्सीने पाहणी करून वरचा मजला हा भाड्याने दिला आहे, असा अभिप्राय दिला आहे. परिणामी, या नोटिसा काढल्या गेल्या आहेत. वार्षिक कर योग्य मूल्य रक्कम अगोदरच भरमसाठ वाढली आहे.
नागरिकांनी त्यावर हरकती घेतल्या आहेत. त्यावर टप्प्याटप्प्याने सुनावण्या घेतल्या जात आहेत. परंतु, आता या नोटिसांमुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मिळकत धारकांनी ही बाब पत्राद्वारे खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठवली आहे.
एखाद्या मिळकतधारकाकडे खरेच भाडेकरू आहे का नाही, याची पाहणी नगरपरिषदेच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी करणे गरजेचे असताना त्रयस्थ एजन्सीच्या माध्यमातून अशी पाहणी केल्यामुळे सदर घोळ निर्माण झाला असल्याचे घरमालक संघटना अध्यक्ष मनोज देशपांडे यांनी सांगितले.
न्यायालयात दाद मागणार
पूर्वी आम्ही एका मजल्यावर सर्व कुटुंब राहत होतो. मुलाचा विवाह झाल्यानतर घराचा वरचा मजला वाढवला. मुले व सुना वरच्या मजल्यावर राहण्यासाठी गेले. परंतु, नगरपरिषदेने नेमलेल्या एजन्सीने वरच्या मजल्यावर भाडेकरू राहतात असे दाखवले. परिणामी, वाढीव घरपट्टीची नोटीस आली आहे. याकडे पालिका लक्ष देणार आहे की नाही. पालिकेच्या या नोटिशीविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रगतीनगर येथील कांतीलाल क्षीरसागर यांनी सांगितले.