Baramati News: ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणतात, तुम्ही मला 30 वर्षे साथ दिली. नंतर अजित पवार यांना 30 वर्षे साथ दिली. आता भविष्याचा विचार करून नातूला साथ द्या. पवारांना कुटुंबाशिवाय इतर कोणी दिसत नाही का? प्रत्येक वेळी त्यांच्याच घरात पाळणा हलला पाहिजे का? असा सवाल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी केला.
पुढे जानकर म्हणाले, पवारांना बारामतीत तावरे, जगताप, देवकाते, कोकरे, काळे, काटे असे कोणी दिसले नाही का? मी शरद पवार यांना मोठे नेते मानतो. पण, त्यांची नीती अशी का आहे? त्यांच्याच घरात वारंवार खासदार, आमदार, विरोधी पक्षनेते ही पदे. इतरांनी फक्त कारखान्याचे संचालक होण्यात समाधान मानायचे का?, असा सवालही त्यांनी केला.
राज्यात आमचे दोन अंकी आमदार निवडून येतील. निकालानंतर महायुती असो की मविआ आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणालाही सरकार बनवता येणार नाही, आम्हीच ’किंगमेकर’ बनू असे जानकर म्हणाले.
महायुती आणि मविआला कोणतेही भविष्य नाही. दोन्हीकडे बघितले तर पती एकीकडे, तर पत्नी दुसरीकडे, मुलगा एकीकडे तर वडील दुसरीकडे अशी स्थिती आहे. आम्ही मात्र उपेक्षितांना संधी देत असल्याचे ते म्हणाले. लोकशाहीत टीका-टिप्पणीचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु, बोलताना आपण कोणाबद्दलही चुकीचे वक्तव्य करू नये, असेही खोत प्रकरणाच्या संदर्भाने ते म्हणाले.