Attack on Police Pudhari
पुणे

Baramati Police Attack: बारामतीत पोलिसांवरच हल्ला! हाणामारी सोडवायला गेलेल्या दोन अंमलदारांना मारहाण

आमराई परिसरातील गोंधळावर नियंत्रण मिळवताना प्रकार; पाच जणांसह साथीदारांवर गुन्हा दाखल, सीसीटीव्ही व तांत्रिक पुरावे तपासणार

पुढारी वृत्तसेवा

बारामती: शहरातील आमराई परिसरात दोन गटांत हाणामारी सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना आपत्कालीन सेवेद्वारे मिळाल्यानंतर तेथे पोहचलेल्या दोघा पोलिस अंमलदारांवरच हल्ला केला गेला. याप्रकरणी मुख्य पाच जणांसह त्यांच्या अन्य अनोळखी साथीदारांविरोधात बारामती शहर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाणीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पोलिस अंमलदार गिरीश नेवसे या घटनेत जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अंमलदार तुषार शिंदे यांनाही किरकोळ दुखापतीला सामोरे जावे लागले. शहर पोलिसांनी याप्रकरणी शुभम भीमराव कांबळे, विपुल अजय अवचिते, शुभम अजय अवचिते, ओम मिथुन पाटोळे, गणेश शंकर पाथरकर आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

शहरातील आमराई परिसरात शुक्रवारी (दि. १०) दीडच्या सुमारास दोन गटांमध्ये भांडण, हाणामारी व गोंधळ सुरू असल्याची माहिती डायल ११२ द्वारे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अंमलदार नेवसे व शिंदे हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होऊ नये तसेच सुरू असलेला गोंधळ वाढू नये, यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून जमाव पांगविण्याचा, दंगा शमविण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचा प्रयत्न केला; मात्र या पाच जणांसह त्यांच्या अन्य साथीदारांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलिसांना धमकावत पोलिसांवरच हल्ला केला. नेवसे या घटनेत जखमी झाले.

या घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडीओ, इलेक्ट्रॉनिक पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच इतर तांत्रिक व वैज्ञानिक पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT