Summary:
बारामती- निरा मार्गावर सुदैवाने टळला अपघात
नागरिकांनी मुजोर हायवाचालकाला विचारला जाब
बारामती : बारामती येथे 27 जुलैला घडलेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच मंगळवारी (दि. 5) बारामती- निरा राज्यमार्गावर कोर्हाळे बुद्रुकनजीक खामगळ पाटीजवळ अशाच मोठ्या अपघाताची पुनरावृत्ती टळली. वेगवान हायवा चालवणार्या चालकाने दोन किलोमीटर दुचाकी वाहनाचा पाठलाग करीत दुचाकीवरील चालक, लहान मुलगा व महिलेच्या अंगावर हायवा घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झाले नसले, तरीही या घटनेमुळे हायवाचालकांची मुजोरी कमी होताना दिसत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Pune News Update)
संबंधित कुटुंब कोर्हाळे येथून बारामतीकडे जात असताना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली. हायवाचालक परप्रांतीय होता; मात्र त्याच्या वयाकडे पाहता तो अल्पवयीन असल्याचे दिसून आले. घटनेनंतर खामगळपाटी येथे प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी वडगाव निंबाळकर पोलिसांना फोन केला. परंतु घटनेनंतर दोन तासानंतर वडगाव पोलिस संबंधित ठिकाणी आले. वडगाव निंबाळकर पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनेबाबत किती गांभीर्याने घेतात हे यावरून स्पष्ट झाले आहे. माळेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी मात्र तातडीने त्या ठिकाणी हजर झाले होते.
घटना घडल्यानंतर दुचाकी चालकाने संबंधित हायवाचालकाला वाहनातून खाली उतरवले. मात्र माझा मालक मोठा आहे, तुम्हाला काय करायचे ते करा, अशी उलट उत्तरे त्याने दिली. मालक मोठा असला तरीही कोणाला मारण्याचा परवाना दिला आहे का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला.
घटना घडल्यानंतर थांबलेल्या प्रवाशांनी वडगाव निंबाळकर पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. मात्र, वाहन नसल्याचे कारण सांगून वडगाव पोलिस संबंधित ठिकाणी उशिरा आले. याउलट माळेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. यावरून वडगाव पोलिसांची असंवेदनशीलता दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.