वीज तारांच्या ठिणग्या पडून ऊस खाक  Pudhari
पुणे

Sugarcane Fire: वीज तारांच्या ठिणग्या पडून ऊस खाक वाणेवाडीतील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान; महावितरणवर संताप

ऑगस्टनंतर सोमेश्वर परिसरात घडलेली दुसरी मोठी घटना आहे

पुढारी वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : वाणेवाडी (ता. बारामती) येथील शेतकरी सौरभ महेंद्र भोसले यांच्या पाऊण एकर उसाचे महावितरणच्या वीजवाहक तारांमधून ठिणग्या पडल्याने पूर्णपणे जळून नुकसान झाले आहे.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे भोसले यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांनी याबाबत तीव नाराजी व्यक्त केली आहे. ऑगस्टनंतर सोमेश्वर परिसरात घडलेली दुसरी मोठी घटना आहे. त्याआधी चोपडज गावातील शेतकरी दिलीप रामचंद्र गाडेकर यांचाही एक एकर ऊस याच प्रकारे जळून खाक झाला होता. (latest Pune News)

ऊस जळीताच्या वारंवार होणाऱ्या घटनांविरोधात सोमेश्वरनगर परिसरातील शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात महावितरण उपविभागीय कार्यालयात जाऊन प्रमुख अधिकारी अजित आंबोरे यांना निवेदन दिले होते. त्यात वीजवाहक तारा, रोहित्रे व खांबांवरील जॉइंट्‌‍स सतत बिघडत असल्याने होणाऱ्या नुकसानीबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केली नाही. त्यामुळे वाणेवाडीतील शेतकऱ्यावर ही आपत्ती ओढवल्याचा आरोप होत आहे.

आता ऊस कारखाने सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे उसाची विल्हेवाट लावण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी तीव संताप व्यक्त करत आहेत. घटना घडल्यानंतर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.

महावितरणने वेळीच दखल घेतली असती, तर हे नुकसान टळले असते, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये असून, महिनाभरात दोन घटना घडूनही प्रशासन गाढ झोपेत असल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी, दोषींवर कारवाई व्हावी, आणि वीज संरचनेच्या देखभालीसाठी तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. वारंवार लेखी निवेदने देऊनही उपविभागीय कार्यालयाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता परिसरातील सर्व सभासद शेतकरी एकत्र येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार आहोत.
- ऋषिकेश गायकवाड, संचालक सोमेश्वर कारखाना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT