पुणे

Baramati News : दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीयांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

बारामती : माणूस काळाच्या पडद्याआड गेला, तरीही त्याच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. त्याने केलेले कार्य, दिलेली प्रेरणा आणि माणसांशी जोडलेले नाते कायम मनात घर करून राहते. याच भावनेचा प्रत्यय बारामतीच्या सनसेट पॉईंटवर आला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या 'एक पणती दादांसाठी... असंख्य आठवणी त्यांच्या कार्यासाठी...' या उपक्रमाला बारामतीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. तब्बल दहा हजारांहून अधिक पणत्यांनी सनसेट पॉईंट उजळून निघाला आणि संपूर्ण परिसर अजितदादांच्या आठवणींनी भावूक झाला.

या उपक्रमाला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, युवा नेते जय पवार, अजितदादांच्या भगिनी विजया पाटील, ऋतुजा जय पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांची उपस्थिती लाभली.

गेली अनेक वर्षे दिवाळी पाडव्याच्या दिवशी अजितदादा बारामतीकरांच्या भेटीसाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उपस्थित असायचे. सर्वसामान्य नागरिकांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला वेळ देत त्यांच्या अडचणी समजून घेणे, बारामतीच्या विकासाचा ध्यास आणि नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणे ही दादांची कार्यशैली होती; मात्र यंदाचा पहिलाच दिवाळी पाडवा दादांशिवाय असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमातील सर्वांत भावस्पर्शी क्षण म्हणजे अजितदादांची साकारण्यात आलेली भव्य आणि आकर्षक रांगोळी. महेंद्र दीक्षित, भारत काळे, सिद्धार्थ कांबळे आणि वेदांत काळे यांनी आपल्या कलाकौशल्यातून अजितदादांचे सुंदर रांगोळीचित्र रेखाटले. या रांगोळीने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

यानंतर परिसरातील सर्व विद्युत रोषणाई बंद करण्यात आली. केवळ हजारो पणत्यांच्या प्रकाशात अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. उपस्थित प्रत्येकाने आपल्या मोबाईलची बॅटरी टॉर्च सुरू करून दादांना अभिवादन केले. हजारो मोबाईल टॉर्च आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळलेला सनसेट पॉईंट हा क्षण उपस्थितांच्या मनावर कायमचा कोरला गेला.

यावेळी सादर झालेल्या 'माझा आनंद हरवला' या भावस्पर्शी गीताने उपस्थितांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दादांसोबतच्या आठवणी, त्यांचा सहवास आणि त्यांनी बारामतीसाठी केलेले कार्य यांचे स्मरण करताना संपूर्ण वातावरण भावुक झाले होते.

या कार्यक्रमाला समस्त बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दादांवर प्रेम करणारे हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोणताही औपचारिकपणा न ठेवता आपल्या मनातील प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पणत्या आणून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष सचिन सातव, नगरसेवक अमर धुमाळ, अमोल कावळे, वैभव जगताप, समीर चव्हाण, नवनाथ बल्लाळ, प्रवीण माने, विशाल हिंगणे, अक्षय डांगे तसेच असंख्य दादाप्रेमी बारामतीकरांनी मोलाचे योगदान दिले.

दहा हजारांहून अधिक पणत्या, हजारो मोबाईल टॉर्च, अजितदादांची आकर्षक रांगोळी आणि प्रत्येकाच्या डोळ्यांत दाटलेल्या आठवणी... हा केवळ दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम नव्हता, तर एका लोकनेत्याने आपल्या माणसांच्या मनात निर्माण केलेल्या अढळ स्थानाची ही जिवंत साक्ष होती.

अजितदादा आज प्रत्यक्षात आपल्यात नसले, तरी त्यांनी बारामतीला दिलेली विकासाची दिशा, कामाची ऊर्जा आणि नागरिकांच्या मनात निर्माण केलेला विश्वास कायम राहणार आहे, हाच संदेश सनसेट पॉईंटवर उजळलेल्या हजारो पणत्यांनी जणू दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT