वाल्मीक कराडचा बारामतीतील हार्वेस्टर मालकांनाही गंडा; शेतकरी सुळेंच्या भेटीला File Photo
पुणे

वाल्मीक कराडचा बारामतीतील हार्वेस्टर मालकांनाही गंडा; शेतकरी सुळेंच्या भेटीला

अनुदानही दिले नाही आणि पैसेही परत केले नाहीत

पुढारी वृत्तसेवा

बारामती: सध्या राज्यभर गाजत असलेल्या तसेच सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मोक्का लागलेल्या परळीतील वाल्मीक कराड याने ऊसतोडणी यंत्र (हार्वेस्टर) अनुदानाच्या आमिषाने फसविलेल्या बारामतीतील शेतकर्‍यांनी गुरुवारी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना आपली कर्मकहाणी सांगितली.

हार्वेस्टर घेतलेल्या शेतकर्‍यांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रत्येकी आठ-आठ लाख रुपये घेतले. अनुदानही दिले नाही आणि पैसेही परत केले नाहीत, अशी तक्रार फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांनी खा. सुळे यांच्याकडे केली.

खा. सुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन करत या प्रकरणाची चौकशी करत शेतकर्‍यांना न्याय द्या, अशी मागणी केली. केंद्र सरकारच्या वतीने ऊसतोडणी मशिनसाठी देण्यात येणारे 40 टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगत वाल्मीक कराडने ही फसवणूक केली असल्याचे या शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

बारामती तालुक्यातील तरडोली येथील शेतकरी व हार्वेस्टर मालक रामचंद्र विठ्ठल भोसले यांनी या फसवणूक प्रकरणाची माहिती खा. सुळे यांच्यासमोर माध्यमांना दिली. भोसले यांच्या म्हणण्यानुसार, मुंडे यांचे कराड हे निकटवर्तीय असून, ते तुम्हाला प्रत्येकी 36 लाख रुपये अनुदान मिळवून देतील, त्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले होते.

पैसे दिल्यानंतर कराडकडे शेतकरी अनुदान कधी मिळणार याची चौकशी करत होते. प्रत्येक वेळी पुढच्या महिन्यात होईल, अशी आश्वासने दिली जात होती. दरम्यान, लोकसभा निवडणूक काळात या शेतकर्‍यांनी बीडमध्ये धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या वेळी मुंडे हे हॉटेलात चौथ्या मजल्यावर तर शेतकरी पहिल्या मजल्यावर होते. त्या वेळी कराड दोन पोलीस संरक्षकासह पाच-सहा गुंडांना घेऊन आला. शेतकर्‍यांना मारहाणीची घटना तेथे घडली.

एसपींकडून चौकशी होईल : खा. सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघातील हार्वेस्टर मालक शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्या अनुषंगाने गुरुवारी बारामतीत शेतकर्‍यांनी भेट घेतली. या शेतकर्‍यांकडून हार्वेस्टर अनुदानासाठी मध्यस्थांनी आठ लाख रुपये घेतले आहेत. शेतकर्‍यांशी सविस्तर चर्चा झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना मी फोन केला.

ते शुक्रवारी (दि. 17) शेतकर्‍यांना भेटतील. चौकशी करतील. पुणे जिल्ह्यात शेतकर्‍यांवर एवढा अन्याय होत असेल, तर ते प्रचंड दुर्दैवी व वेदनादायी आहे. काळ्या मातीशी इमान राखणार्‍या शेतकर्‍यांना अनुदानासाठी पैसे द्यावे लागत असतील, तर किती दुर्दैवी स्थिती आहे, असे खा. सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT