बारामती: हवामान विभागाने 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची माहिती दिल्यानंतर शेतकर्यांना आता पावसाचे वेध लागले आहेत. पाऊस लवकर सुरू होणार असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून प्रचंड उन्हाने हैराण झालेल्या शेतकर्यांची उकड्यापासून मुक्तता होणार आहे.
बारामती तालुक्यातील शेतकर्यांकडून रब्बी हंगामातील तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून, समाधानकारक पाऊस झाल्यानंतर पेरण्या सुरू होणार आहेत. पावसाची आतुरतेने वाट पाहणार्या बळीराजाला पुढील 15 दिवसांत दिलासा मिळणार आहे.
केरळमध्ये नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून दाखल होत असून, यंदा पाऊस चांगला बरसणार आहे. मान्सून नियोजित तारखेच्या चार दिवस आधी म्हणजे दि. 27 मे रोजी केरळामध्ये येणार आहे. केरळमध्ये मान्सून 1 जून दाखल होत असतो.
परंतु, हवामान अंदाजानुसार यंदा मान्सून 23 मे ते 31 मेदरम्यान कधीही येऊ शकतो. अंदमान निकोबारमध्ये गेल्या वर्षी 19 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर केरळात 30 मे रोजी आला होता. परंतु, यंदा त्याच्या आधी 27 मे रोजीच येणार आहे. वेळेत पाऊस सुरू होणार असल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (latest pune news)
याशिवाय जनावरांच्या चार्याचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होणार आहे. गेल्या कित्येक वर्षातील बारामती तालुक्यातील तापमान यंदा सर्वाधिक पाहायला मिळाले. बागायती पट्टा असूनही उन्हाची तीव्रता सर्वाधिक जाणवली गेली. अवकाळी पावसाने मात्र बारामती तालुक्यात पाठ फिरवली. जिरायती भागातील शेतकर्यांची भिस्त अवकाळी पावसावर होती. मात्र, पावसाने हुलकावणी दिली.