Ajit Pawar Pudhari
पुणे

Baramati Election Emotional Victory: बारामतीत अजित पवारांच्या आठवणींना भावनिक विजय

जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत बारामतीकरांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र गलांडे

बारामती: अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती जणू पोरकी झाली. रस्ते शांत झाले, चौकातली गर्दी थांबली, प्रत्येक घरात एकच विषय, दादा आता नाहीत. ही बातमी केवळ एका नेत्याच्या जाण्याची नव्हती, तर बारामतीचा आधारवड कोसळल्याची होती. अशा वेदनादायी वातावरणात झालेली जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक आणि त्यातून समोर आलेला निकाल हा राजकीय नव्हे, तर पूर्णपणे भावनिक ठरला. बारामतीकरांनी मतांचे भरभरून दान राष्ट्रवादीच्या पदरात टाकत आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिल्याचे निकालातून दिसून आले.

बारामती तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा, तर पंचायत समितीच्या 12 जागा आहेत. अजितदादा यांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या बेरजेच्या राजकारणात भाजपला पंचायत समितीच्या सुपे व शिर्सुफळ या दोन जागा द्यायचे मान्य करत तेथे राष्ट्रवादीचे उमेदवार दिले नव्हते. दुसरीकडे भाजपच्या दुसऱ्या गटाने मात्र जिल्हा परिषदेच्या चार जागी आणि पंचायत समितीच्या या दोन जागा वगळता अन्य आठ ठिकाणी उमेदवार दिले. परंतु, अजितदादांनी सोडलेल्या दोन जागा वगळता भाजपला अन्यत्र मोठे अपयश आले. अनामत रक्कम वाचू शकेल, अशी कामगिरीसुद्धा अनेक ठिकाणी करता आली नाही. बहुजन समाज पक्ष, शिवसेना (शिंदे गट) व अन्य पक्षांसह अपक्षांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले.

अजितदादांच्या अकाली निधनाची किनार यंदाच्या या निवडणुकीला होती. मतदानाच्या दिवशी तालुक्यात फारसा उत्साह नव्हता. मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले होते. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा 15 टक्क्यांनी मतदान घसरले ते लाडक्या नेत्याच्या निधनामुळेच. तर, सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर बारामतीकरांच्या भावना पुन्हा एकदा भरून आल्या. हा विजय कोणत्याही उमेदवाराचा नव्हता, तो अजितदादांच्या आयुष्यभराच्या कामाचा होता. पाणी आणलेली गावे, शिकलेल्या पिढ्या, उभ्या राहिलेल्या संस्था, मिळालेला रोजगार हे सारे निकालादिवशी मतदारांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. म्हणूनच हा कौल ङ्गङ्घदादांची आठवणफफ म्हणूनच पाहिला जात आहे.

दादा नसते तर आज बारामती अशी नसती. हा निकाल दादांना श्रद्धांजली आहे. बारामतीने या निकालातून स्पष्ट केले की नेतृत्व शरीराने संपते, पण प्रेम, विश्वास आणि ऋणानुबंध कधीच संपत नाहीत,फफ अशा भावूक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिल्या. अजितदादा यांच्या आकस्मिक निधनाने बारामतीकर कोलमडून गेले. या दुःखद वातावरणात निवडणूक पार पडली. पण, निकालात बारामतीच्या मतदारांनी दिलेला कौल केवळ राजकीय नव्हे, तर तो नेत्याप्रती असलेली अतूट निष्ठा, ऋणानुबंध आणि विश्वासाची भावनिक साक्ष ठरला.

अजितदादा नसले तरी बारामतीचा मतदार त्यांच्या विचारांच्या पाठीशी ठाम उभा आहे. प्रत्येक क्षेत्रात दादांनी दिलेले योगदान आजही मतदारांच्या स्मरणात ताजे असल्याचे निकालातून दिसून आले. शोकातून सावरत असलेल्या बारामतीकरांनी दिलेला हा कौल राजकारणापलीकडचा ठरला. दुसरीकडे या दुःखद प्रसंगात राष्ट्रवादीच्या विरोधकांनीही प्रचारात कटूता टाळली. मतदाना दिवशीही त्यांनी आपली जबाबदारी शांतपणे पार पडली. राष्ट्रवादी विरोधकांना निवडणूकीत यश आले नाही. पण त्यांनी अत्यंत संयमीतपणे आणि जबाबदारीने ही निवडणूक हाताळली, हे या निवडणूकीचे वैशिष्ट्‌‍य ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT