बारामती : किरकोळ कारणावरून भावकीतील एकाचा खून केल्याच्या खटल्यात आबासाहेब रामचंद्र गवारे (रा. गवारे फाटा, फलटण रोड, बारामती) याला येथील जिल्हा न्यायाधिश बी. डी. शेळके यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
दि. २४ मार्च २०२१ रोजी ही घटना घडली होती. आबासाहेब गवारे यांनी बाळासाहेब भानुदास गवारे यांचा खून केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. दि. १४ मार्च रोजी आबासाहेब गवारे व बाळासाहेब गवारे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यातून आबासाहेब याने बाळासाहेब याच्या घरात घुसून लोखंडी गजाने डोक्यात मारहाण केली होती. उपचारादरम्यान बाळासाहेब यांचा मृत्यू झाला होता. याबाबत मयत बाळासाहेब यांच्या मुलाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. (Pune Latest News)
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. ॲड. कमलाकर नवले यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. साक्षीदारांचा पुरावा, डाॅक्टरांची साक्ष व नवले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आबासाहेब गवारे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात पोलिस निरीक्षक विलास नाळे, महिला अंमलदार उमा कोकरे, उपनिरीक्षक जी. केे. कसपटे, एन. ए. नलवडे यांच्यासह ॲड. आशीष खुंटे, ॲड. श्रीराम दंडवते यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.