Baramati cooperative leadership pudhari
पुणे

Baramati cooperative leadership: अजितदादांनंतर बारामतीच्या सहकारी संस्था वाऱ्यावर

कणखर आणि सडेतोड नेतृत्वाअभावी अनागोंदी

पुढारी वृत्तसेवा

प्रा. अनिल धुमाळ

शिवनगर: अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने बारामतीच्या केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर इथल्या बलाढ्य सहकारी संस्थांच्या चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या संस्था सध्या कणखर, सडेतोड आणि पकड असलेल्या नेतृत्वाअभावी वाऱ्यावर सुटल्याचे दिसत आहे.

माळेगाव, सोमेश्वर हे सहकारी साखर कारखाने, बारामती तालुका दूध संघ, तालुका खरेदी-विक्री संघ, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती सहकारी बँक, स्थानिक पातळीवरील लहान-मोठ्या सहकारी संस्थांवर वर्षानुवर्षे अजितदादांचा थेट आणि वचक असलेला ताबा होता. पण, आता हा वचक कायम ठेवण्यासाठी प्रशासकीय पकड असलेला आणि तितकाच सडेतोड निर्णय घेणारा कणखर नेता बारामतीला हवा आहे.

अजितदादांच्या चुकीला माफी न देण्याच्या स्वभावामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाऱ्या या सहकारी संस्था केवळ ‌‘दादा‌’ नावाच्या वलयावर सुरळीत चालल्या नाहीत, तर दादांच्या ‌‘पोलादी पकडी‌’मुळे टिकून राहिल्या, विस्तारल्या आणि सभासदांना त्यांचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. लाखोंच्या मताधिक्याने दादा विजयी होत. त्यामध्ये सहकारातील लाभामुळे सुखावलेल्या सभासदांचा मोठा वाटा होता.

अजितदादांचा शब्द अंतिम असायचा. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांना गटबाजी करण्याची हिंमत होत नव्हती. आता दादांच्या अनुपस्थितीत प्रत्येक नेता स्वतःला ‌‘किंगमेकर‌’ समजून संस्थांवर वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करीत आहे. संस्थांवर वर्चस्वासाठी अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता आहे.

जर अंतर्गत वाद वाढले, तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या संस्था डबघाईला यायला वेळ लागणार नाही. सहकारात ‌’राजकारण‌’ आले की ‌’आर्थिक शिस्त‌’ बिघडते, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बारामती याला अपवाद राहिली ती केवळ दादांच्या सडेतोड भूमिकेमुळे. आता जर सैल कारभार झाला, तर संस्थांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते?

अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नाही. सध्या पवारांच्या घरातील नव्या पिढीकडे किंवा स्थानिक नेत्यांकडे राजकीय महत्त्वाकांक्षा असली, तरी सहकार क्षेत्रातील तांत्रिक बाबी, बँकिंगचे नियम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याचा अनुभव अजूनही कमी पडतो आहे.

आज परिस्थिती बदलली आहे. संस्थांची नावे बदलून किंवा त्यांचे नामकरण ‌’अजितदादा‌’ करून त्यांच्या आठवणी नक्कीच जपल्या जातील; पण संस्थांचा गाडा पुढे नेण्यासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.

प्रत्यक्ष मैदानात उतरून रोज सकाळी संस्थांचा आढावा घेणारा ‌’कमांडिंग लीडर‌’ बारामतीला हवा आहे. पवारांच्या घरातील कोण ही जबाबदारी घेणार? यावरच पुढचे चित्र अवलंबून असेल. आगामी काळात बारामतीने योग्य आणि कणखर नेतृत्व निवडले नाही, तर सहकार क्षेत्रात बारामतीचे जे अव्वल स्थान आहे, त्याला मोठा धक्का बसू शकतो. आता वेळ केवळ भावुक होण्याची नाही, तर बारामतीचे वैभव टिकविण्यासाठी खंबीरपणे पावले उचलण्याची गरज आहे.

केवळ वारशाने सहकार वाचणार नाही

केवळ सत्तेचा तामपट घेऊन आलेला वारसदार बारामतीची सहकार चळवळ वाचवू शकत नाही. जो कोणत्याही दबावाला बळी न पडता संस्थेच्या हिताचे निर्णय घेईल. चुकीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अजितदादांसारखे भर चौकात किंवा भरबैठकीत सुनावण्याची धमक असणारा नेता हवा, ज्याला केवळ भाषणे करता येत नाहीत, तर सहकार कळतो आणि शेतकऱ्यांच्या घामाची किंमत कळते, अशा नेत्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT