Baramati Assembly by-elections | काँग्रेसच्या माघारीनंतर बारामतीत 23 जण रिंगणात 
पुणे

Baramati Assembly by-elections | काँग्रेसच्या माघारीनंतर बारामतीत 23 जण रिंगणात

काँग्रेससह 30 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही निवडणूक होणार

पुढारी वृत्तसेवा

बारामती : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसाअखेर गुरुवारी (दि. 9) 30 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. या जागेसाठी आता 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. निवडणूक बिनविरोध करण्याचे आटोकाट प्रयत्न महायुतीच्या नेत्यांनी केले. काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेतला; पण अन्य उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यात अपेक्षित यश आले नाही.

बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 53 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 6 जणांनी बुधवारी माघार घेतली होती. उर्वरित 47 जण रिंगणात राहिले होते. त्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज महत्त्वाचा होता. गुरुवारी बारामती दौर्‍यावर असलेल्या खा. शरद पवार यांनी काँग्रेसने विचारले तर निवडणूक बिनविरोध व्हावी, असा सल्ला देऊ, असे सांगत काँग्रेसला अप्रत्यक्ष सल्ला दिला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार त्यांचे उमेदवार अ‍ॅड. आकाश मोरे यांनी अर्ज माघारी घेतला. त्यांच्यासह अन्य 24 जणांनी गुरुवारी माघार घेतली. त्यामुळे या जागेसाठी आता 23 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

बिनविरोध निवडणूक होणार नाही हे अर्जाच्या संख्येवरून दिसत होते. तरीही राष्ट्रवादीने अखेरच्या दिवशी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन बारामतीत उमेदवार देऊ नये, अशी विनंती केली होती. त्यामुळे काँग्रेसने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अन्य उमेदवारांनाही राष्ट्रवादीने अर्ज मागे घेण्याची विनंती केली; पण ती पूर्ण झाली नाही. दुपारी तीन पर्यंत 24 जणांचेच अर्ज मागे घेण्यात यश आले. आता महायुती-राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य 23 जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

निवडणुकीसाठी भाजपकडून 40 स्टार प्रचारकांची नावे

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार्‍या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या बड्या नेत्यांची नावे आहेत.

सुनेत्रा पवारांच्या आग्रहामुळेच माघार : हर्षवर्धन सपकाळ

या निर्णयामागे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांचा मोठा प्रभाव आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 5 एप्रिलपासूनच संपर्क साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर बुधवार आणि गुरुवारीही त्यांनी फोन करून पुन्हा आग्रह धरला. याशिवाय छगन भुजबळ, धनंजय मुंडे तसेच अजित पवार गटातील इतर नेत्यांनीही काँग्रेसकडे माघारीची विनंती केली होती. सुनेत्रा पवारांच्या आग्रहामुळेच काँग्रेसची बारामतीतून माघार घेतली.

सपकाळ सकारात्मक वाटत होते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात एखाद्या नेत्याचे निधन झाल्यानंतर त्या ठिकाणची निवडणूक ही त्यांच्या कुटुंबासाठी बिनविरोध करण्याची परंपरा आहे. त्या द़ृष्टिकोनातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली आहे. चर्चेदरम्यान ते सकारात्मक वाटत होते. मात्र, काँग्रेसने काय निर्णय घेतला? हे आपल्याला माहिती नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

राहुरीचे चित्र स्पष्ट, 7 उमेदवार रिंगणार

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. अखेरीस या पोटनिवडणुकीत सात उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत भाजपकडून अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) समर्थक अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे तसेच अपक्ष उमेदवार म्हणून सूर्यभान लांबे, महेश हापसे आणि अथर्व म्हसे हे उमेदवार रिंगणात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT