वडगाव शेरीचे माजी आमदार बापुसाहेब पठारे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासमवेत राष्ट्रवादीमधील तीन माजी नगरसेवकांनी प्रवेश केल्याने महायुतीला धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत सिल्वर ओकवर पठारे यांच्यासह त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भय्यासाहेब जाधव, महादेव पठारे तसेच पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी पक्षप्रवेश केला. गत विधानसभा निवडणुकीत पठारे यांनी अजित पवार यांना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता विधानसभेसाठी ते पुन्हा इच्छुक होते. मात्र, महायुतीत वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) राहणार असल्याचे निश्चित असल्याने पठारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सवात त्यांनी जाहीरपणे उमेदवारीसाठी तुतारी हातात घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्या प्रचाराची औपचारिकता बाकी होती. मंगळवारी सायंकाळी त्यांनी हा पक्षप्रवेश केला. पठारे हे विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाने त्यांची तुतारीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.