बँकांनी सायबर क्राइमपासून खबरदारी घ्यायला हवी; अजित पवार यांची महत्त्वपूर्ण सूचना Pudhari
पुणे

Pune: बँकांनी सायबर क्राइमपासून खबरदारी घ्यायला हवी; अजित पवार यांची महत्त्वपूर्ण सूचना

बँकांनी विश्वासार्हतेबरोबरच ग्राहक व लोकाभिमुखता जपावी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नागरी सहकारी बँकांचे जाळे सर्वत्र पसरले असून विश्वासार्हतेबरोबर बँकांनी ग्राहक व लोकाभिमुखता जपायला हवी. बँकांच्या कामकाजात जसा आमूलाग्र बदल होत आहे, त्याचप्रमाणे सायबर क्राईमही वाढल्याने बँकांनी खबरदारी घेण्यावर भर दयायला हवा, अशी महत्वपूर्ण सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कारण, सायबर क्राइमच्या माध्यमातून देशात 70 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली असून, ही बाब हलक्यात घेऊ नका. त्यासाठी राज्य बँकेने स्वतंत्र सेल केला असून, त्यांचा बँकांनी लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. (Latest Pune News)

रामराज्य सहकारी बँकेच्या नव्या वास्तूचा कोनशिला उद्घाटन समारंभ बिबवेवाडीतील बँकेच्या प्रांगणात पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. 17) सायंकाळी करण्यात आला. या वेळी आमदार चेतन तुपे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक व बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांच्यासह रामराज्य बँकेचे संस्थापक विजयराव मोहिते, अ‍ॅड. सुभाष मोहिते, बँकेच्या अध्यक्षा नंदा लोणकर, उपाध्यक्ष शिरीष मोहिते तसेच बँकेचे सर्व संचालक व व्यवस्थापकीय मंडळातील सदस्य उपस्थित होते.

सहकारातील आव्हाने लक्षात घेऊन कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी समिती नेमली जात आहे. त्यांच्या अहवालानंतर अधिवेशनात त्यावर योग्य तो निर्णय घेऊ, असे नमूद करुन पवार म्हणाले, बँकांचे संचालक मंडळ स्वतःच्या प्रपंचाकडे कमी लक्ष देऊन संस्थेकडे अधिक लक्ष देतात. त्यांना प्रोत्साहन लाभ (इंटेसिव्ह) मिळाला पाहिजे अशी चर्चा मुंबईतील एका कार्यक्रमात झाली आहे. त्यावर निश्चितपणे शासन विचार करीत आहे.

अँड. सुभाष मोहिते म्हणाले, बँकेचे आजमितीस 11 हजार सभासद आहेत. समाजातील शेवटचा माणूस बँकिंगशी जोडला जावा, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला संदेश आम्ही पूर्ण करीत आहोत.

बँकेच्या अध्यक्षा नंदा लोणकर यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेतला. मार्च 2025 अखेर बँकेच्या ठेवी 170 कोटी तर कर्जवाटप 96 कोटी झाल्याचे त्यांनी नमूद केले. प्रास्तविक विजयराव मोहिते तर आभार प्रदर्शन शिरीष मोहिते यांनी मानले.

... अन् पवार यांची ग्वाही नि टाळ्यांचा एकच कडकडाट

सहकार व बँकिंग क्षेत्रातील आपण सर्वजण आता 65 वयापर्यंत पोहोचलो आहोत. या चळवळीत केवळ नाष्टा, चहा, भत्यापुरते नवतरुण संचालक नुसते नकोत. तर ही चळवळ पुढे जाण्यासाठी तरुण संचालकांना सहकार शिक्षण-प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची सूचनाही पवार यांनी यावेळी बोलताना केली. रामराज्य बँकेस स्व.

आमदार शरद रणपिसे यांचे मार्गदर्शनाची उणीव सध्या जाणवत असल्याचा उल्लेख विजयराव मोहिते यांनी केला होता. तो धागा पकडत रणपिसे यांची उणीव माणुसकी, जिव्हाळा जपत मी भरुन काढून बँकेच्या कामास साथ देईल, अशी ग्वाही पवार यांनी देताच उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT