पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : माळशिरस येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फोडून 51 लाख 16 हजार रुपयांची रोकड लंपास करणारे चोरटे अवघ्या बारा तासांच्या आत वाकड पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून 4 लाख 10 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पिंपरी येथे ही कारवाई करण्यात आली.
फैसल इब्राहीम शेख (29, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. ठाणे), शाहरुख सत्तार पटवारी (28, रा. औंध. मूळ रा. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मंगळवारी (दि. 18) पहाटे माळशिरस येथील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक फोडली.
गॅस कटरच्या सहाय्याने बँकेच्या स्ट्राँगरुममधून 51 लाख 16 हजार 477 रुपयांची रोकड चोरून नेली. तसेच, चोरट्यांनी बँकेच्या लॉकर रूममधील सहा लॉकर गॅस कटरने फोडले. चोरी केल्यानंतर आरोपी चोरीचे साहित्य बँकेतच फेकून पैसे घेऊन पळून गेले. याप्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी भारत लोंढे यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना माहिती मिळाली की, माळशिरस येथे बँक फोडून पळालेले आरोपी पिंपरी येथे येणार आहेत. त्यानुसार, पोलिसांनी मोहननगर कडून मोरवाडी कोर्टाकडे जाणार्या रस्त्यावर सापळा लाऊन एक संशयित कार पकडली. कारमधून आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी माळशिरस येथे बँक फोडल्याची कबुली दिली.
कारची झडती घेतली असता पोलिसांना 4 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम मिळून आली. आरोपींना सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलिस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, पोलिस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक फौजदार बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलिस अंमलदार वंदू गिरे यांच्यासह पोलिस पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा