Pudhari
पुणे

Bandu Andekar Gang: बंडू आंदेकर टोळीवर मोक्का; आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर चालणार हातोडा

आत्तापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे : उच्च शिक्षण घेणार्‍या आपल्या नातवाचा कट रचून गोळ्या झाडून खून घडवून आणणार्‍या कुख्यात गँगस्टर सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर याच्यासह त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली आहे. याप्रकरणी 13 जणांवर ही कारवाई झाली असून, आत्तापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक केली आहे, तर पाच जणांचा गुन्हे शाखेची पथके, स्थानिक पोलिस ठाण्याच्या पथकाकडून कसून शोध सुरू आहे. (Pune Latest News)

टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकर (वय 70), तुषार नीलंजय वाडेकर (वय 27), स्वराज नीलंजय वाडेकर (वय 23), वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय 40) यांना बुलडाणा येथून अटक केली आहे. अमन युसुफ पठाण (वय 25, सर्व रा. नाना पेठ), सुजल राहुलू मेरगु (वय 20, भवानी पेठ), यश सिद्धेश्वर पाटील (वय 19) आणि अमित प्रकाश पाटोळे (वय 19, दोघेही रा. नाना पेठ) यांना या प्रकरणात अटक झाली आहे. तर टोळीतील फरार शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय 31), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय 40), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय 21), शिवराज उदयकांत आंदेकर (वय 29) आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय 60, सर्व रा. नाना पेठ) यांच्यावरही ही मोक्काची कारवाई केली आहे.

आयूष ऊर्फ गोविंद गणेश कोमकर (वय 19) याच्या खूनप्रकरणी कल्याणी गणेश कोमकर यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 5 सप्टेंबर रोजी आयुषचा लहान भाऊ ए. डी. कॅम्प परिसरात खासगी क्लाससाठी गेला होता. त्याला घेण्यासाठी आयुष सातच्या सुमारास गेला. त्याला आणण्यासाठी आयुष गेल्यानंतर घराच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करीत असताना त्याचा निर्घृणपणे गोळ्या झाडून आंदेकर टोळीने खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते. या प्रकरणात आंदेकर टोळीच्या 13 जणांवर मोक्काची कारवाई करण्याचा प्रस्ताव समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी तयार केला. उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या वतीने अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांना सादर केला. त्यानुसार टोळीविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सक्रिय लोकांना देखील सोडणार नाही

कुख्यात आंदेकर टोळीने दहशतीच्या जोरावर ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे बांधकामे, ताबेमारी केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुणे महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येणार असून, त्याद्वारे अनधिकृत बांधकामांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. टोळीचा मुख्य आर्थिक कणा मोडून त्यांच्यावर जरब बसवण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासोबतच आंदेकर टोळीतील विविध स्तरांतील सक्रिय लोकांना देखील सोडणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

बंडू आंदेकरच्या उपस्थितीत घराची झाडाझडती

दरम्यान, बुधवारी (दि. 10) बंडू आंदेकर याच्या नाना पेठेतील घराची गुन्हे शाखेसह समर्थ पोलिसांनी झाडाझडती घेतली. रात्री उशिरापर्यंत ही झडती सुरू होती. या वेळी मोबाईल अथवा आयुषच्या खुनाच्या नियोजनासंदर्भात काही पुरावे सापडताहेत का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. पोलिसांनी बंडू आंदेकर याला देखील सोबत नेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT