पुणे

Pune : दौंडमधील वासुंदे गावची केळी युरोपला

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वासुंदे गावातून 20 मेट्रिक टन केळ्यांचा चाळीस फूट कंटेनर मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमार्फत जल वाहतुकीद्वारे युरोपला प्रायोगिक तत्त्वावर (ट्रायल शिपमेंट) पाठविण्यात आला आहे. जल वाहतुकीद्वारे प्रथमच केळ्यांची युरोपला निर्यात करण्यात आली आहे. वासुंदे येथील आयएनआय या खासगी कंपनीद्वारे केळी निर्यातीस केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.9) हिरवा कंदील दाखविण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून युरोपमध्ये केळ्यांची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याचा प्रयत्न आहे.

कार्यक्रमास अपेडाच्या ताजी फळे आणि भाजीपाला विभागाच्या महाव्यवस्थापक विनिता सुधांशू, मुंबई विभागीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, राज्याच्या कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक डॉ. के. पी. मोते, केळी निर्यातदार, प्रगतिशील केळी उत्पादक शेतकरी, आयएनआय फार्म्सचे कर्मचारी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतमाल निर्यातीत जगात भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी अपेडा सक्रियपणे काम करीत असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

राज्यात केळ्यांचे सुमारे एक लाख हेक्टरइतके क्षेत्र असून, केळी निर्यात प्रामुख्याने आखाती देशातच होत आहे. केळी निर्यातीत महाराष्ट्राचा 73 टक्के वाटा असून, युरोपमधील नेदरलॅण्डला आयएनआय कंपनीने 17 लाख रुपयांची केळी प्रायोगिक तत्त्वावर निर्यात केली असून, अपेडाचे सहकार्य आणि कृषी विभागाच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले आहे. त्याठिकाणी उत्तम दर मिळाल्यास द्राक्षांप्रमाणेच राज्यातील सर्व विभागांतून केळी निर्यातीस प्रोत्साहन मिळून शेतकर्‍यांना फायदा होईल.
                            – डॉ. के. पी. मोते, फलोत्पादन संचालक, कृषी विभाग, पुणे.

SCROLL FOR NEXT