मंचर: जळगावची केळी बाजारात येऊ लागल्याने पुणे व सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. बाजारभावातील घसरणीमुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
एक एकर केळी बागेवर ठिबक, औषधे, खते, मजुरी, मल्चिंग पेपर आदींसह अंदाजे दीडलाख रुपये खर्च येतो. साधारण बारा महिन्यांत उत्पादन सुरू होते आणि एक महिन्यात फळबाग रिकामी होते. (Latest Pune News)
गुणवत्तापूर्ण पद्धतीने शेती केल्यास एकरी 35 ते 40 टनपर्यंत उत्पादन मिळते. मात्र, जळगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर केळी उत्पादन होत असल्याने बाजारात एकदम माल येतो आणि भाव गडगडतात. पूर्वी 30 रुपये किलोला विकली जाणारी केळी आता गुणवत्तेनुसार 20 ते 25 रुपयांच्या दरम्यान बांधावर खरेदी होऊ लागली आहे.
किरकोळ बाजारात केळी 50 ते 60 रुपये डझन दराने विकली जात आहे. बाजारभाव कमी झाला तरी किरकोळ विक्रेते आपले बाजारभाव कमी करत नाहीत, असे मंचर-लांडेवाडी येथील ग्राहक शाम गुंजाळ यांनी सांगितले.
आंबेगाव-जुन्नर तालुक्यात सुमारे अडीच हजार एकरांवर केळीचे पीक घेतले जाते. तरकारी मालातील सततच्या चढ-उतारामुळे ऊसाबरोबर अनेक शेतकरी केळीची शेती करू लागले आहेत.
गुणवत्तापूर्ण केळी परदेशात निर्यात होऊ शकते, अशी माहिती पिंपळगावचे निर्यातदार नितीन पोखरकर माडीवाले यांनी दिली. त्यांनी सांगितले की, कमी औषधे वापरून लॅब रिपोर्टप्रमाणे तयार केलेली केळी 22 रुपये किलो हमी दराने खरेदी करून परदेशात निर्यात केली जातात. योग्य व्यवस्थापन व गुणवत्तेमुळे शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन होऊ शकते.
एकरी लाखो रुपये खर्च करून बाग तयार केली जाते. योग्य भाव न मिळाल्यास मोठे नुकसान होते. परदेशात मागणी आहे, पण त्यासाठी हमीभाव आणि योग्य खरेदीची गरज आहे.- शिवाजी भोर, केळी उत्पादक शेतकरी, रांजणी.
जळगावची केळी बाजारात आल्यावर भाव घसरतात. खर्च प्रचंड आहे, पण भाव मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते.- गणेश वाघ, केळी उत्पादक शेतकरी, रांजणी.
गुणवत्तापूर्ण केळीला नेहमीच मागणी असते. आम्ही 22 रुपये किलो दराने हमीभाव देतो. कमी औषधांचा वापर करून तयार केलेली केळी परदेशी बाजारात सहज निर्यात होतात.- नितीन पोखरकर, माडीवाले, केळी निर्यातदार.