नानगाव; पुढारी वृत्तसेवा : आठवड्यापासून अवकाळी पावसाने हैदोस घातला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी दौंड तालुक्यातील काही गावांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि गहू, कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून वातावरणात अवकाळी पावसाचे बदल होत आहे. दिवसभर आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी गार हवेची झुळूक येत असते. अधून-मधून पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे अवकाळीच्या चिंतेमुळे बळीराजा हैराण झाला आहे.
दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गहू व कांदा लागवड आहे. काही ठिकाणी गव्हाची कापणी झाली आहे, तर काही ठिकाणी पीक काढणीला आले आहे. कांदापिकेही जोमात उभी आहेत. बदलत्या हवामानात तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला, तर बळीराजाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे सध्या गहू उत्पादक शेतकरी गहू काढणीच्या कामात मग्न आहे. राज्यात बर्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. नानगाव भागातही अवकाळीने जोरदार हजेरी लावली, तर गहू व कांदापिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
पंचनामा करण्यास येणार अडचण
सध्या गावकामगार तलाठी हे संपावर असल्यामुळे ज्या भागात अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, अशा भागातील पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे नानगाव भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले, तर पंचनामे करण्यासाठीही अडचणी उभ्या राहू शकतात.