पुणे; पुढारी वृत्तसेवा : शाळेचे नवीन वर्ष सुरू होणार म्हटल्यावर नवीन खाऊचा डब्बा आणि वॉटर बॅग आलीच. मग, आई-वडिलांसोबत खरेदीसाठी बाजारपेठ गाठायची. अशाप्रकारे नवीन खाऊचा डब्बा आणि वॉटर बॅग घेण्यासाठी पालकांसोबत चिमुकल्यांची बाजारात लगबग सुरू आहे. बाजारात युनिकॉर्न, मिकीमाऊस, सिंड्रेला, छोटा भीमच्या चित्रांच्या वॉटर बॉटल व खाऊचे डब्बे दाखल झाले आहेत. 250 मिलीपासून एक लिटरपर्यंत असलेल्या या बाटल्या व डब्बे शंभर रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
शाळेत आपला डबा आणि वॉटर बॅग हटके दिसावी, यासाठी प्रत्येक जण काही तरी नवीन शोधताना दिसत आहेत. यासाठी लहान मुले या दुकानातून त्या दुकानात जाऊन डब्बे व बॉटलची पाहणी करीत आहेत. यंदा बॉटल, तसेच डब्यांमध्ये भरपूर प्रकार असून, वयोमानानुसार पालक वॉटर बॉटल, तसेच डब्यांची निवड करताना दिसत आहे. विक्रेते कुणाल शहा म्हणाले, की काही दिवसांत शाळा सुरू होत आहे.
त्यामुळे, शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांसह चिमुकल्यांची लगबग वाढली आहे. प्लॅस्टिकची छोटी बॅग आणि त्यात टिफिन आणि वॉटर बॉटल असा बॅग विथ टिफिनचा ट्रेंड यंदा चालला आहे. यामध्ये कॅरी टिफिन किंवा पर्सच्या स्वरूपात उपलब्ध आहे. बच्चे कंपनीच्या स्टाइलला साजेशी वेगवेगळ्या आकारांतील ही बॅग 100 ते 500 रुपयांना उपलब्ध आहे.
हेही वाचा